परदेशातील बैठकीत तोंड लपवण्याचा प्रयत्न करतो, असे का म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी? रस्त्यावरील यमदुतांना असा घालणार लगाम
Overload Truck Accident- Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. या समस्येवर त्यांनी एक उपाय सुचवला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. ते कोणताही मुलाहिजा ठेवता त्यांच्या मनातील भावना थेट मांडतात. आज लोकसभेत रस्ते अपघातांवरील चर्चेदरम्यान गडकरी यांच्या एका वक्तव्याची चर्चा होत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर रस्ते अपघात 50 टक्के कमी करण्याचे आपले लक्ष्य होते. पण अपघात कमी करण्याचे सोडा, हे प्रमाण वाढल्याचे मान्य करायला मला लाज वाटत नसल्याचे ते म्हणाले. कोणत्याही आंतरराष्ट्रीय परिषदेत जेव्हा रस्ते अपघातांची चर्चा होते तेव्हा मी तोंड लपवण्याचा प्रयत्न करतो, असे ते म्हणाले.
ओव्हलोड ट्रक हे यमदूत
ओव्हरलोड ट्रकमुळे अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. रस्त्यावरील यमदुतांना लगाम घालण्यासाठी आता एक सिस्टिम विकसीत करण्यात येत आहे. ही पद्धत लागू झाल्यानंतर ट्रक मालकांना, या ट्रकमध्ये किती वजनाचे साहित्य, सामान वाहून नेण्यात येत आहे, त्याची माहिती ट्रकवर लिहावी लागणार आहे. गुरुवारी लोकसभेत प्रश्नकालमध्ये रस्त्यावरील अपघातावर चर्चा झाली. महामार्गावर हे ओव्हरलोड ट्रक ओळीने उभे करण्यात येतात. आम्ही NHAI ला कार्यवाही करायला सांगतो. पण कायदा आणि सुरक्षा हा राज्याच्या अखत्यारीतील विषय आहे, असे ते म्हणाले.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर
सातत्याने हा विषय राज्याच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे वैतागून आम्ही एक तंत्रज्ञान विकसीत केले आहे. त्यासाठी नियम तयार केला आहे. वेट मॅनेजमेंट सिस्टिम तयार केल्याचे त्यांनी सांगीतले. या नवीन पद्धतीमुळे ट्रकमध्ये किती वजन वाहून नेण्यात येणार आहे, याची माहिती समोर येईल. जोरहाट येथील अपूर्ण महामार्ग फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
गौरव गोगाई यांचा प्रश्न काय?
काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी आसाममधील रस्ते अपघाताविषयी माहिती दिली. हे अपघात ओव्हरलोड ट्रकमुळे होत असल्याचे त्यांनी सांगीतले. हे ट्रक ओव्हरलोड असले तरी ते अतिवेगाने धावतात. त्यासंबंधीचा प्रश्न गोगाई यांनी विचारला. या यमदूतांना कसं थांबवणार, कसं या घटना रोखणार असा सवाल गोगोई यांनी केला होता.