‘जिहादींच्या मृत्यूचा बदला घेणारच’, दहशतवादी म्हणतात, पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी सगळं उडवून देऊ…
जम्मू-काश्मीरमधील जिहादींच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली असून अनेक ठिकाणं बाँबने उडवून देण्याची धमकी दिली.
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Miniater Narendra Modi) 21 ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर जात आहेत. मात्र त्याआधीच बद्रीनाथ, केदारनाथ आणि इतर मंदिरांसह राज्यातील अनेक रेल्वे स्थानके (Railway station) आणि धार्मिक स्थळे उडवून देण्याची धमकी देणारे पत्र (Letter) पोलीस स्टेशनला प्राप्त झाले आहे. हे पत्र हरिद्वार रेल्वे स्थानकावर सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. हे पत्र मिळताच राज्यातील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
या पत्रामुळे खळबळ उडाली असून सर्वत्र तपासणी केली जात आहे. याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
या धमकीच्या पत्राबद्दल तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, साध्या पोस्टाने हे पत्र आले असून हे पत्र 10 ऑक्टोबर रोजी हरिद्वारच्या स्टेशन अधीक्षकांना मिळाले आहे.
पत्र लिहिणाऱ्याने आपले नाव जमीर अहमद त्यामध्ये लिहिले आहे. तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर असल्याचाही त्याने दावा केला आहे.
पत्रात जम्मू-काश्मीरमधील जिहादींच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ आपण घेतली असल्याचे सांगत अनेक ठिकाणं बाँबने उडवून देण्याची धमकी दिली आहे.
या महिन्याच्या 25 आणि 27 ऑक्टोबर रोजी हल्ला करणार अशी धमकी देण्यात आली आहे. 25 ऑक्टोबर रोजी हरिद्वार, लक्सर, काठगोदाम, डेहराडून, रुरकी, काशीपूर, मुरादाबाद, बरेली, नजीबाबाद, शहागंजसह उत्तराखंडमधील सर्व रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देणार असल्याचे त्या पत्रात म्हटले आहे.
तर 27 ऑक्टोबर रोजी हरिद्वारमधील हर की पैडी, भारत माता मंदिर, चंडी देवी, मनसा देवी इत्यादी प्रमुख मंदिरांव्यतिरिक्त यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, या ठिकाणीही बॉम्बस्फोट घडवून आणून बद्रीनाथ आणि इतर प्रमुख मंदिरं उडवून देण्याची धमकी दिली गेली आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक अरुणा भारती यांनी सांगितले की, उत्तराखंडमध्ये यापूर्वीही अशाच प्रकारची धमकीची पत्रे अधिकार्यांना मिळाली होती. मात्र आता नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याने या पत्रातील धमकीची दखल घेत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यावर्षी कंवर यात्रेदरम्यान असेच एक पत्र रुरकी येथील अधिकाऱ्यांनाही मिळाले होते.या पत्रामुळे खबरदारी उपाय म्हणून रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.