Violence in Bengal : पश्चिम मेदिनीपूरमध्ये केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्यावर हल्ला, गाडीच्या काचा फोडल्या
पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील पंचखुंडी गावात केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना घडलीय. व्ही. मुरलीधरन हे या हल्ल्यातून बचावले आहेत.
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर बंगालमधील विविध भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडत आहे. भाजप कार्यकर्त्यांवर सातत्याने हल्ले सुरुच आहेच. आता पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील पंचखुंडी गावात केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना घडलीय. व्ही. मुरलीधरन हे या हल्ल्यातून बचावले आहेत. पण त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालंय. (Attack on Union Minister of State V. Muralitharan’s convoy In West Medinipur)
व्ही. मुरलीधरन हे पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय टीमचे सदस्य आहेत. ते पश्चिम मेदिनीपूर मधील हिंसाचाराने पीडित कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांसोबतची बैठक आटोपून ते परत निघाले होते. त्यावेळी काही स्थानिक लोकांनी त्यांच्या गाडीवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालंय. या हल्ल्यातून मुरलीधरन बचावले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनीच केंद्रीय मंत्र्यावर हा हल्ला केल्याचा आरोप स्थानिक भाजप नेत्यांनी केलाय.
#WATCH Union Minister V Muraleedharan’s car attacked by locals in Panchkhudi, West Midnapore#WestBengal
(Video source: V Muraleedharan) pic.twitter.com/oODtHWimAW
— ANI (@ANI) May 6, 2021
हिंसाचारानंतर पाहणीसाठी केंद्रीय पथक दाखल
दुसरीकडे, बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिकाऱ्यांची चार सदस्यीय समिती बंगालमध्ये पाठवली आहे. हे पथक हिंसाचारांच्या घटनांनी प्रभावित झालेल्या परिसराचा दौरा करेल आणि पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. गृह मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांच्या नेतृत्वाखाली हे पथक केंद्रीय गृह मंत्रालयाला आपला अहवाल सादर करेल. कोलकाता इथं पोहोचल्यानंतर हे पथक डीजी आणि गृह सचिवांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी केंद्रीय पथकाने राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे. राज्य सरकारकडून अद्याप परवानगी देण्यात आली आहे की नाही, याची माहिती मिळू शकलेली नाही.
‘ममता बॅनर्जी असा ‘खेला’ करतील माहिती नव्हतं’
पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरुन भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराने देशाचं विभाजन आणि Direct Action Day ची आठवण करुन दिली. ममता बॅनर्जी यांना जनादेश मिळाला असला तरी ममता बॅनर्जी आपल्या तिसऱ्या टर्मची सुरुवात रक्ताने माखलेल्या हातांनी करत आहेत, अशा शब्दात नड्डा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढवलाय. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा बंगालच्या दौऱ्यावर आहेत. हिंसाचारात मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. त्यानंतर नड्डा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हिंसाचारानं 1946 च्या नरसंहाराची आठवण करुन दिली
‘भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या परिवारावर हल्ले करण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे महिलांवरही हल्ला करण्यात आला. महिलांसोबत दुष्कर्म केलं. महिला सर्वाधिक असुरक्षित आहेत. आम्ही जनादेशाचा आदर करतो, मात्र जनादेशामुळे सत्य लपून राहत नाही. लूटमार सुरु आहे. जेव्हा मी 1946 ची गोष्ट करतो, तेव्हाही रक्ताचे पाट वाहिले होते. आजही 2 मे नंतर पश्चिम बंगालमध्ये रक्त पाहायला मिळत आहे. मी हिंसाचाराचा निषेध करतो. आम्ही असहिष्णुतेचे विचार नष्ट करु’, असा विश्वासही नड्डा यांनी यावेळी व्यक्त केलाय.
संबंधित बातम्या :
ममता बॅनर्जी असा ‘खेला’ करतील माहिती नव्हतं, हिंसाचारानं Direct Action Day ची आठवण करुन दिली – भाजप
Violence In Bengal : भाजपकडून हिंसाचाराचे जुने व्हिडीओ पसरवण्याचं काम, ममता बॅनर्जी संतापल्या
Attack on Union Minister of State V. Muralitharan’s convoy In West Medinipur