Kolkata Rape Murder Case : दिल्ली ते चेन्नईपर्यंत डॉक्टर रस्त्यावर; 24 तासांच्या बंदची हाक, रुग्णालयात कोण-कोणत्या सेवा राहतील बंद
Nationwide IMA Doctor Strike : पश्चिम बंगालमध्ये कोलकत्ता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरावर अत्याचार आणि तिची हत्या करण्यात आल्यानंतर देशभरात डॉक्टरने संताप व्यक्त केला आहे. देशव्यापी संपाची हाक दिल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे.
कोलकत्ता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांनी 24 तासांच्या बंदची हाक दिली आहे. आज, 17 ऑगस्ट रोजी या बंदला सुरुवात झाली आहे. डॉक्टरांची संघटना IMA ने या संपात सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर दिल्लीपासून ते चेन्नईपर्यंत आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. डॉक्टरांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत सरकारने ठोस पावलं टाकावीत, या हत्याप्रकरणाचा योग्य तपास आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
या सेवा राहतील बंद
भारतीय वैद्यकीय संघटनेने देशव्यापी बंदची हाक दिली आहे. पण डॉक्टर रुग्णांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. कोलकत्ता प्रकरणात निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन आणि प्रदर्शन करण्यात येईल. या काळात सर्व आवश्यक सेवा सुरु असतील. जखमी रुग्णांवर उपचार करण्यात येतील. पण या दरम्यान नियमीत ओपीडी आणि वैकल्पिक शस्त्रक्रिया होणार नाहीत.
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
डॉक्टरांवर रुग्णाचे नातेवाईक हल्ला करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढले आहे. त्यातच कोलकत्ता येथे क्रुरतेचा कळस गाठण्यात आला. आयएमएने डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा लावून धरला आहे. या संपासोबत आयएमएने पाच प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत देशभरात एक व्यापक कायदा आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
देशभरात कँडल मार्च
कोलकत्ता घटनेच्या विरोधात डॉक्टरांनी संताप व्यक्त केला आहे. तामिळनाडू येथील तिरुनेलवेलीमध्ये शुक्रवारी हजारो डॉक्टरांनी कँडल मार्च काढला. तर उत्तर भारतात ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयाच्या डॉक्टर आणि नर्सिंग स्टॉफने मोर्चा काढला. इंदुरमध्ये डॉक्टरांचा संताप दिसला. येथे डॉक्टर आणि नर्सिंग स्टॉफने शुक्रवारी रात्री कँडल मार्च काढला. देशातील सर्वच राज्यात या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.
पुण्यात डॉक्टर संपावर
कोलकत्ता घटनेच्या निषेधार्थ देशभरात IMA ने संपाची हाक दिली आहे. राज्यातील अनेक शहरात डॉक्टरांनी या घटनेचा निषेध केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे देशभरात 24 तासासाठी काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. देशभरातील निवासी डॉक्टर देखील संपावर आहेत. त्याचा राज्यससह देशातील आरोग्य सेवेला मोठा फटका बसणार आहे.कोलकत्यात झालेल्या घटनेचा निषेधार्थ आणि निवासी डॉक्टरांना सुरक्षा पुरावी या मागणीसाठी IMA कडून संप पुकारण्यात आला आहे. अनेक संघटनांनी आयएमएच्या संपाला पाठिंबा दिला आहे. पुण्यात पण डॉक्टरांचे काम बंद आंदोलन सुरु आहे.