BJP | लोकसभा निवडणुकीआधी भाजपासाठी धोक्याची घंटा, ‘या’ राज्यात भाजपाच्या कामगिरीत मोठी घसरण
भारतातील एका प्रमुख राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवरील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपाची चिंता वाढवणारे हे निवडणूक निकाल आहेत. लोकसभा आणि विधानसभेला भाजपाने जिथे चांगली कामगिरी केली होती, त्या मतदारसंघातही भाजपाला चांगली कामगिरी करता आलेली नाही.
कोलकाता : पुढच्यावर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत. भाजपाने आतापासून त्याची तयारी सुरु केली आहे. मागच्या दोन निवडणुकांप्रमाणे तिसऱ्या खेपेला मोठे मताधिक्क्य मिळवून सत्तेत जाण्याची भाजपाची योजना आहे. पण त्याआधी भाजपाला झटका बसला आहे. देशातील एका प्रमुख राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला मोठा झटका बसला आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी ही चांगली बाब नाहीय.
निश्चित हे निवडणूक निकाल भाजपाची चिंता वाढवणारे आहेत. लोकसभा आणि विधानसभेला भाजपाने जिथे चांगली कामगिरी केली होती, त्या मतदारसंघातही भाजपाला चांगली कामगिरी करता आलेली नाही.
हिंसाचारामुळे निवडणूक चर्चेत
पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुका हिंसाचारामुळे चर्चेत आल्या. पंचायत निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसलाय. सत्ताधारी तृणमुल काँग्रेसच्या तुलनेत बऱ्याच भागात भाजपा पिछाडीवर आहे. 2019 च्या लोकसभा आणि 2021 च्या विधासभा निवडणुकीत भाजपाने जिथे चांगली कामगिरी केली होती, तिथे सुद्धा भाजपा पिछाडीवर पडली आहे. मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर 24 परगणा आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात भाजपा, काँग्रेस आणि सीपीआय(एम) तिन्ही पक्ष मागे राहिले.
कोणी किती जागा जिंकल्या?
9 जून नंतर मुर्शिदाबाद आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात सर्वाधिक हिंसाचार आणि मृत्यू झाले आहेत. दक्षिण 24 परगणामध्ये तृणमुल काँग्रेसने 6383 ग्राम पंयायतीच्या सीटपैकी 2568 सीट जिंकल्या. मुर्शिदाबादमध्ये 5593 पैकी 1441 सीट जिंकल्या. या दोन जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक 63 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे.
लोकसभा-विधानसभेला किती जागा जिंकलेल्या?
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. भाजपाने 2019 मध्ये पश्चिम बंगालमधून लोकसभेच्या 18 जागा जिंकून तृणमुल काँग्रेसला झटका दिला होता. 2021 विधानसभा निवडणुकीत राज्यातील 294 पैकी 75 विधानसभा जागा जिंकल्या होत्या. दोन्ही निवडणुकीत उत्तर बंगालच्या आठही जिल्ह्यात भाजपाच्या प्रदर्शनाने TMC ची चिंता वाढवली होती.
भाजपाने 8 जिल्ह्यात किती जागा जिंकलेल्या?
2021 मध्ये भाजपाने या आठ जिल्ह्यात 54 पैकी 30 जागा जिंकल्या होत्या. टीएमसीने विधानसभेला राज्यातील 294 पैकी 215 जागा जिंकल्या होत्या. उत्तर बंगालमधून भाजपाने लोकसभेच्या 8 जागा जिंकल्या होत्या. ग्रामपंचायतीच्या किती जागा जिंकल्या?
भाजपाने मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत उत्तर बंगालच्या कूच बिहार जिल्ह्यात ग्राम पंचायतीच्या 2507 जागांपैकी फक्त 315 जागा जिंकल्या होत्या. जलपायगुडी जिल्ह्यात भाजपाने 1701 ग्रामपंचायत जागांपैकी फक्त 161 जागा जिंकल्या आहेत. उत्तर आणि दक्षिण दिनाजपुर जिल्ह्यात भाजपाने ग्रामपंचायतीच्या 2220 आणि 1308 जागांपैकी 82 आणि 37 जागाच जिंकल्या आहेत.