WITT 2025 : जात-धर्म नव्हे, विकासाचे राजकारण करणार, चिराग पासवान यांचा पावित्रा
टीव्ही 9 च्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' या कार्यक्रमात चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणूक, धार्मिक राजकारण आणि त्रिपट तलाक या विषयांवर आपले मत मांडले. त्यांनी जात-धर्म पलीकडे जाऊन विकासावर भर द्यावा असे मत व्यक्त केले.

टीव्ही 9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या महामंचाच्या तिसऱ्या पर्वाच्या आज दुसरा दिवस आहे. या कार्यक्रमानिमित्त लोक जनशक्ती पार्टीचे नेते आणि मंत्री चिराग पासवान यांनी जात धर्माबद्दल बोलताना उघडपणे भूमिका मांडली. मी कोणत्याही जात आणि धर्माच्या चौकटीत विचार करत नाही. तसेच कोणत्याही प्रकारच्या जातीयवादी किंवा धार्मिक राजकारणाचे समर्थन करत नाहीत, असे चिराग पासवान यांनी म्हटले.
या कार्यक्रमात चिराग पासवान यांनी राजकारणातील आगामी इच्छा काय याबद्दल सांगितले. मला आता राज्याच्या राजकारणात सक्रिय राहण्याची आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणूक मी पूर्ण ताकदीने लढणार आहे. बिहार एनडीए मध्ये असलेले पाच पक्ष नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतील. तसेच २४३ विधानसभा जागांपैकी किमान २२५ जागांवर विजय मिळवतील, असा विश्वास चिराग पासवान यांनी व्यक्त केला.
तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरही समाजात चुकीची धारणा
यावेळी चिराग पासवान यांना वक्फ विधेयकावरील भूमिकेबद्दल विचारले असता त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले. मुस्लीम समाजातही अनेक लोक असे आहेत, ज्यांनी या विधेयकातील सुधारणांना सरकारचा उघडपणे पाठिंबा दिला आहे. त्यांचीही इच्छा होती की हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) जावे आणि तिथे चर्चा झाल्यावर हे स्पष्ट झाले की अनेक मुस्लिमांना या बदलांमध्ये काहीच अडचण नाही. तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरही समाजात चुकीची धारणा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु वस्तुस्थिती वेगळी होती, असे चिराग पासवान म्हणाले. अल्पसंख्यकांमध्येही जे दुर्लक्षित आहेत, त्यांचा आवाज बनण्याची माझी इच्छा आहे, असेही चिराग पासवान यांनी नमूद केले.
धर्म हा प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रद्धेचा विषय
यावेळी चिराग पासवान यांना नमाज आणि औरंगजेब यांच्यावरून सुरू असलेल्या राजकीय वादावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी थेट विधान केले. रस्ते आणि छतांवर नमाज व्हायला हवी की नाही, यावर चर्चा करणे निरर्थक आहे. याऐवजी विकास आणि प्रगती यावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. धर्म हा प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे. जात-धर्माच्या गोष्टी पूर्णपणे निरुपयोगी आहेत. धर्माला लोकांच्या घराच्या चार भिंतींमध्येच मर्यादित ठेवले पाहिजे, असे चिराग पासवान म्हणाले. मंदिर आणि मस्जिद यांच्यातील वादावरही चिराग पासवान यांनी भाष्य केले. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाशी अधिक सहमती दर्शवली.