Pahalgam: पहलगाम हल्ल्यामागील सर्वांत मोठं कारण; ‘या’ चुका पडल्या महागात
सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याने पहलगाममधील बैसरन याठिकाणी दहशतवादी सहज हल्ला करू शकले, अशी बाब समोर येत आहे. याबाबत गुरूवारी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींबद्दल विरोधकांनी काही सवाल उपस्थित केले.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी कारणीभूत असल्याची कबुली केंद्र सरकारने गुरूवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिली. पहलगाममधील बैसरन पठारवर 22 एप्रिल रोजी दुपारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्याच्या ठीक दोन दिवस आधी म्हणजेच 20 एप्रिलपासून बैसरनचं पठार सुरक्षा यंत्रणेच्या परवानगीविना पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं. आश्चर्याची बाब म्हणजे याची माहिती पहलगामच्या स्थानिक प्रशासनालाही नव्हती. तिथल्या स्थानिक पर्यटन कंपन्यांनी पर्यटकांना बैसरन पठारावर घेऊन जाणं सुरू केलं. पण त्याची माहिती सुरक्षा व्यवस्थांना नव्हती. त्यामुळे बैसरन भागात निमलष्कराची किंवा पोलिसांची सुरक्षा तैनात केली गेली नाही, अशी माहिती बैठकीत देण्यात आल्याचं आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी सांगितलं. ...