Chandrayaan-3 | लूना-25 रात्रीच्या अंधारातही लँड करु शकत होतं, मग चांद्रयान-3 सूर्योदयाची गरज का?
Chandrayaan-3 Update | या मिशनमध्ये असं काय आहे की, सूर्यास्तानंतर चांद्रयान-3 लँडिंग करु शकत नाही. रशियाच्या लूना-25 मध्ये अशी कुठली सिस्टिम होती, जी आपल्या चांद्रयान-3 मध्ये नाहीय.
नवी दिल्ली : रशियाच लूना-25 मिशन फेल झालं आहे. शनिवारी लूना-25 च चंद्रावर क्रॅश लँडिंग झालं. रशियाच मिशन फेल झालं असलं, तरी भारताच्या नंतर उशिराने मिशनची सुरुवात करुनही लूना-25 चंद्रावर पहिलं पोहोचणार होतं. इस्रोच्या तुलनेत रशियन अवकाश संशोधन संस्था रॉसकॉसमॉसकडे शक्तीशाली रॉकेट असल्याने सहाजिकच लूना-25 पाच दिवसात चंद्राच्या कक्षेत दाखल झालं. तेच चांद्रयान-3 ला चंद्राच्या कक्षेत पोहोचण्यासाठी 21 दिवस लागले.
त्यात दुसरी अशी गोष्ट होती की, रशियाच्या लूना-25 ला लँडिंगसाठी 23 ऑगस्टपर्यंत थांबण्याची गरज नव्हती. आज म्हणजे 21 ऑगस्टला मिशन लाँच झाल्यानंतर 10 दिवसात लूना-25 चंद्रावर उतणार होतं. पण दुर्देवाने ऑर्बिट बदलताना लूना-25 च क्रॅश लँडिंग झालं.
लूना-25 ला लँडिंगसाठी 23 ऑगस्टपर्यंत थांबण्याची गरज का नव्हती?
आता अनेकांच्या मनात प्रश्न आहे की, भले शक्तीशाली रॉकेट नसल्यामुळे चंद्रावर पोहोचायला चांद्रयान-3 ला 21 दिवस लागले. पण चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर लँडिंगसाठी आपण 23 ऑगस्टपर्यंत का थांबणार? लूना-25 आपल्याआधी कसं लँड होऊ शकतं? यामागे काय कारण आहे?
आपल्याला सूर्य प्रकाशाची इतकी गरज का?
सर्वप्रथम एक गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे की, 23 ऑगस्टला चंद्रावर सूर्योदय होणार आहे. चंद्रावरचा एक दिवस पृथ्वीवरच्या 14 दिवसांसमान असतो. चांद्रयान 3 च आयुष्य फक्त एकादिवसा पुरता आहे. म्हणजे विक्रम लँडर आणि रोव्हर उपकरणांची निर्मिती चंद्रावर एक दिवस काम करण्यापुरता करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे ही सर्व उपकरण सौर ऊर्जेवर चालणारी आहेत. ही उपकरण चालू राहण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज भासते.
म्हणून आपल्याला 23 ऑगस्टशिवाय पर्याय नाही
रात्रीच्यावेळी चंद्रावर मोठ्या प्रमाणात थंडी असते. तापमान मायनस 100 डिग्रीच्या खाली असते. इतक्या कमी तापमानात काम करण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्मिती केलेली नाही. या वातावरणात ही उपकरण गोठली जातील. कामच करणार नाहीत. म्हणून आपल्याला 23 ऑगस्टशिवाय पर्याय नाही.
अन्यथा सप्टेंबरपर्यंत थांबाव लागेल
चांद्रभूमीवर जास्तीत जास्त प्रयोग करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी दिवसाच्या सुरुवातीलाच चंद्रावर लँडिंग होण आवश्यक आहे. काही कारणामुळे 23 ऑगस्टला लँडिंग शक्य झालं नाही, तर पुढच्यादिवसाची वाट पाहावी लागेल. हे सुद्धा शक्य नसेल, तर संपूर्ण महिना वाट पाहावी लागेल. 29 दिवस थांबाव लागेल म्हणजे सप्टेंबरची प्रतिक्षा करावी लागेल. लूना 25 मध्ये काय सिस्टिम होती?
लुना 25 ला अशा कुठल्या मर्यादा नव्हत्या. त्यामध्ये सुद्धा सौरऊर्जेवर चालणारी उपकरण होती. पण लूना 25 मध्ये ऑनबोर्ड जनरेटर होता. रात्रीच्या अंधारातही उपकरणांना ऊर्जा मिळू शकत होती. लूना 25 मिशनच आयुष्य एक वर्षाच होतं. त्यासाठी चंद्रावर किती सूर्यप्रकाश आहे? यावर अवलंबून राहण्याची गरज नव्हती.