मार्चमध्ये का पडतोय एवढा पाऊस?; हवामान विभागाने सांगितलं मोठं कारण!
हवामान खात्याने राजस्थानच्या आठ जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. राजस्थानात गारपीटीसह पाऊस होणार असून त्यामुळे शेतीचं नुकसान होणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.
नवी दिल्ली : मार्च महिन्यात कडक ऊन पडत असताना महाराष्ट्रासह देशातील विविध भागात अवकाळी पावसाने प्रचंड थैमान घातलं आहे. जोरदार बरसणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं झोपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हवामानात अचानक बदल झाल्याने कडक उन्हाळ्यात हिवाळा जाणवत आहे. हवामान खात्याने उद्या म्हणजे 1 एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच गारपीट होण्याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाणार असल्याने बळीराजा अधिकच चिंतातूर झाला आहे.
महाराष्ट्रासह उत्तर पश्चिम भारतातही गेल्या दोन आठवड्यांपासून पाऊस सुरू आहे. कालही दिल्लीत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दिल्लीतील हवामानात गारवा निर्माण झाला आहे. यंदा प्रचंड उकाडा होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, बिन मौसम बरसात सुरू झाल्याने मार्चमध्येच थंडी पडली आहे. त्यामुळे लोक आता घरातून बाहेर पडताना छत्र्या घेऊनच बाहेर पडताना दिसत आहे. काही ठिकाणी तर विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी गारपीटी होताना दिसत आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यातील अनेक जिल्ह्यात हेच चित्र दिसत आहे.
मार्चमध्ये कुठे कुठे पाऊस
साधारणपणे मार्चमध्ये पाऊस होत नाही. झालाच तर मेच्या अखेरीस पावसाचा शिडकावा येतो. पण यंदा मार्चमध्येच पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर-पश्चिमेकडील काही राज्यातही पाऊस झाला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीत पाऊस झाला. चंदीगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र आणि राजस्थानातही मोठा पाऊस झाला. या ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.
मार्चमध्ये काय बिघडलंय?
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मार्च महिन्यात पाऊस होत असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळेच उत्तर-पश्चिमेकडे पाऊस होत आहे. या महिन्यात आतापर्यंत चार वेस्टर्न डिस्टर्बन्सने उत्तर पश्चिम भरातातील मैदानी परिसरांना प्रभावित केलं आहे. हा अवकाळी पाऊस शेतीसाठीही फायदेशीर नाही आणि आरोग्यासाठीही लाभदायक नसल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.
पारा घसरला
अवकाळी पावसामुळे तापमानही घसरले आहे. मागच्या वर्षी दिल्लीत मार्चमध्ये पाऊस झाला नव्हता. तेव्हा दिल्लीत मार्च नंतर किमान तापमान 38 अंश सेल्सिअस होते. तर कमाल तापमान 39 डिग्री सेल्सिअस होते. या वर्षी मार्चमध्ये दिल्लीतील कमाल तापमान 35 डिग्री सेल्सिअल इतके नोंदवलं गेलं आहे. येत्या 24 तासात हवामानात कोणताही बदल होणार नसल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. मात्र, येत्या चार दिवसात दोन ते चार डिग्री अंशाने पारा घसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.