मुलाच्या कॉलेजच्या फीसाठी आईने संपवलं आयुष्य, भरपाईसाठी बससमोर मारली उडी, धक्कादायक दृश्य CCTV मध्ये कैद
आपल्या मुलाचं भविष्य घडावं, त्याचं शिक्षण पूर्ण व्हाव म्हणून एका आईने सर्वोच्च त्याग केला. घटनेच्याच दिवशी तिने आणखी एका बससमोर उडी मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तेव्हा...
चेन्नई : आई-वडील (parents love) आपल्या मुलांवर निस्सीम, निस्वार्थ प्रेम करतात. त्यांच्या सुखासाठी ते काहीही करू शकतात. याचेच एक ताजे पण तितकेच हृदयद्रावक उदाहरण पहायला मिळाले. मुलाच्या कॉलेजची फी भरण्यासाठी एका आईने (woman jumped in front of bus) बससमोर उडी मारत स्वत:चं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तामिळनाडूमध्ये हा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार घडला.
चालत्या बससमोर उडी मारून तिने आयुष्य संपवलं, जेणेकरून तिच्या मुलाला नुकसान भरपाईचे (compensation) पैसे मिळतील व तो त्याच्या कॉलेजची फी भरू शकेल. अतिशय धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी असलेली ही घटना तामिळनाडूच्या सेलम येथील असून हा प्रकार सीसीटीव्ही मध्येही कैद झाला आहे.
बसची टक्कर झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. पपाथी (45) असे महिलेचे नाव असून ती कलेक्टर कार्यालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होती. मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी तामिळनाडू सरकारतर्फे आर्थिक मदत मिळावी यासाठी 28 जून रोजी या महिलेने बससमोर उडी मारून आयुष्यच संपवलं. या महिलेची कोणीतरी दिशाभूल केल्याचे समोर आले आहे. आर्थिक मदत हवी असेल तर हा उपाय हा उपाय (बससमोर उडी मारण्याचा) करावा असा चुकीचा सल्ला या महिलेला एका व्यक्तीने दिला. त्यानंतर पैशांसाठी या महिलेने हे पाऊल उचलण्याची तयारी दर्शवली आणि तिचं आयुष्य संपवलं.
मुलाच्या भविष्यासाठी उचललं आत्मघाती पाऊल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने या अपघातापूर्वी त्याच दिवशी आणखी एका बससमोर उडी मारण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र तेव्हा तिला एका दुचाकीची धडक बसली होती. थोड्या वेळाने तिने पुन्हा रस्ता ओलांडला आणि तिची बसशी धडक झाली. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेजही समोर आले असून त्यामध्ये महिलेची बसशी धडक होतानाचे दृष्य दिसत आहे. त्यानंतर त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
डिप्रेशनमध्ये होती महिला
सू्त्रांच्या माहितीनुसार, मुलाच्या कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे भरू न शकल्यामुळे ही महिला डिप्रेशमध्ये होती. त्याच वेळी कोणीतरी तिची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. रस्ते अपघातात मरण पावल्यास सरकार तिच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून पैसे देईल, असे त्या महिलेला सांगण्यात आले होते, असे समजचे. त्यामुळेच तिने हे आत्मघाती पाऊल उचलले. मृत महिला पतीपासून विभक्त झाली होती व एकटीच मुलाचे पालन पोषण करत होती.