Women Reservation Bill : आतापर्यंत इंदिरा गांधी एकमेव महिला पंतप्रधान झाल्या, किती महिला राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री झाल्या पाहा
संसदेच्या विशेष अधिवेशनात लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत किती महिला उच्च राजकीय पदापर्यंत पोहचल्या आहेत. पाहूयात
नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : संसदेच्या विशेष अधिवेशनात लोकसभेत महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन अधिनियम या विधेयकावर चर्चा सुरु आहे. भाजपा आणि कॉंग्रेसमध्ये या विधेयकाचे श्रेय घेण्यावरुन साठमारी सुरु आहे. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी या विधेयकाला कॉंग्रेसने आधी आणले होते असे सांगत त्यांनी भाजपावर आक्रमण केले आहे. त्यावर भाजपाने हे बिल केवळ भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे असे सांगत आपला दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे अनेक राज्ये अशी आहेत तेथे महिला मुख्यमंत्री देखील झालेल्या नाहीत. पाहुयात स्वातंत्र्यानंतर किती महिला मुख्यमंत्री आणि राष्ट्रपती पदापर्यंत पोहचल्या…
महिला राष्ट्रपती
महिला राष्ट्रपती पदाचा विचार करता आतापर्यंत दोन महिला राष्ट्रपती पदावर पोहचल्या आहेत. पहिल्या महिला राष्ट्रपती कॉंग्रेसच्या युपीए सरकारच्या काळात प्रतिभाताई पाटील बनल्या होत्या. त्या 25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012 पर्यंत या पदावर होत्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या एनडीए सरकारमध्ये द्रौपदी मुर्मू या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. त्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत.
महिला पंतप्रधान
तर आतापर्यंत इंदिरा गांधी या एकमेव महिला पंतप्रधान झाल्या आहेत. त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान आहेत ज्या 1966 पासून 1977 पर्यंत लागोपाठ सलग तीन वेळा पंतप्रधान म्हणून निवडून आल्या. त्यानंतर 1980 ते 1984 असा चौथी टर्म देखील त्यांनी पूर्ण केली. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांनी हत्या झाली.
महिला मुख्यमंत्री
महिला मुख्यमंत्री म्हणून भारतात आतापर्यंत 16 महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत. देशाची पहिली मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसच्या राज्यात 2 ऑक्टोबर 1963 मध्ये सुचेता कृपलानी यांनी काम पाहिले. त्यानंतर बसपाच्या मायावती उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. बिहारच्या मुख्यमंत्री राबडी देवी झाल्या. कॉंग्रेसच्या राज्यात शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. तामिळनाडूत एआयएडीएमकेच्या जे.जयललिता मुख्यमंत्री झाल्या. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा कार्याकाळ देखील मोठा आहे.
विविध राज्याच्या महिला मुख्यमंत्री
उत्तर प्रदेश – सुचेता कृपलानी, ओडिशा- नंदिनी सत्पथी , गोवा- शशिकला काकोडकर, आसाम – अनवारा तैमूर, तामिळनाडू- वीएन जानकी रामचंद्रन, जे तामिळनाडु – जयललिता, उत्तर प्रदेश – मायावती, पंजाब- राजिंदर कौर भट्टल, बिहार- राबड़ी देवी, दिल्ली – सुषमा स्वराज, दिल्ली- शीला दीक्षित, मध्यप्रदेश – उमा भारती, राजस्थान – वसुंधरा राजे, प.बंगाल- ममता बनर्जी, गुजरात- आनंदीबेन पटेल, जम्मू-कश्मीर- महबूबा मुफ्ती.