Vande Bharat Express : वंदेभारतमधून झोपून प्रवास करायला मिळणार, केव्हा येणार स्लिपर कोचवाली वंदेभारत ?
भविष्यात चेअरकार वंदेभारतना शताद्बी गाड्यांच्या जागी तर स्लिपर कोच वंदेभारताला राजधानी एक्सप्रेसच्या जागी पर्यायी गाडी म्हणून चालविण्याची योजना आहे.
नवी दिल्ली : रेल्वे प्रवास वेगवान आणि आरामदायी करणारी सेमी हायस्पीड वंदेभारत एक्सप्रेसना चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच दिल्ली ते भोपाळ अशी अकरावी वंदेभारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. तसेच दिल्ली ते जयपूर अशी अजमेरसाठी देखील या आठवड्यात वंदेभारत सुरू होणार आहे. आतापर्यंत देशात सुरू झालेल्या वंदेभारत या चेअरकारवाल्या एक्सप्रेस होत्या. आता स्लिपर कोचवाल्या वंदेभारतची निर्मिती लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आरामात झोपून प्रवास करायला मिळणार आहे.
देशात नुकतीच 11 वी वंदेभारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानक ( भोपाळ ) ते नवी दिल्ली धावणारी वंदेभारत अकरावी वंदेभारत ठरली आहे. सध्याच्या सेमी हायस्पीड ‘वंदेभारत’ दर ताशी 180 कि.मी. वेगाने धावत आहे. या सर्व वंदेभारत चेअरकारवाल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या प्रवासासाठी त्या गैरसोयीच्या आहेत.
भारतीय रेल्वेने स्लीपर कोचवाल्या वंदेभारत बनविण्याचे काम रेल्वे विकास गिगम लिमिटेडला सोपवले आहे. एकूण 120 सेमी हायस्पीड ट्रेन बनविल्या जाणार आहेत. त्यासाठी 24 हजार कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की 29 मार्च रोजी आरव्हीएनएलला यासाठी स्वीकृती पत्र देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लातूर येथील नव्या कारखान्यात स्लीपर कोचवाल्या वंदेभारतची निर्मिती होणार आहे.
ताशी 220 किमी वेगाने धावणार
वंदेभारतच्या नव्या आवृत्तीच्या वेगात वाढ होणार आहे. स्लीपर कोचवाल्या वंदेभारत दर ताशी 220 किमी वेगाने धावतील असे जानेवारीमध्ये एका रेल्वे अधिकाऱ्याने म्हटले होते. हा वेग सध्या देशात धावत असणाऱ्या कोणत्याही वेगवान ट्रेनपेक्षा जादा असणार आहे. प्रत्यक्षात रेल्वे ट्रॅ्कवर वंदेभारतला प्रति तास 200 किमी वेगाने चालविले जाईल. भविष्यात चेअरकार वंदेभारत एक्सप्रेसना शताद्बी गाड्यांच्या जागी चालविण्यात येणार आहे. तर स्लिपर कोच वंदेभारताला राजधानी एक्सप्रेसच्या जागी पर्यायी गाडी म्हणून चालविण्याची योजना असल्याचे सूत्रांनी सांगितले.
200 स्लिपर आणि चेअरकार वंदे भारत
भारतीय रेल्वेने एकूण 400 वंदेभारत ट्रेन चालविण्याची योजना आखली आहे. आता सुरू असलेल्या चेअरकार वंदेभारतचा वेग ताशी 180 किमी आहे. परंतू रेल्वे रूळांची स्थिती आणि शहरातील विभिन्न क्षेत्रानूसार अनेक भागात या ट्रेनला यापेक्षा कमी वेगात चालविले जात आहे. एकूण 400 वंदेभारतची योजना आहे. त्यात 200चेअरकार तर 200 स्लिपर वंदेभारत एक्सप्रेस चालविण्याची सरकारची योजना आहे.