अखेर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर आले, परंतु 15 दिवस कुठे होते?
15 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले भाजपचे आमदार नितेश राणे कॅमेऱ्यासमोर आलेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. ही निवडणूक संपताच नितेश राणे जिल्हा बँकेत आले. मात्र नितेश राणे 15 दिवस नेमके कुठं होते ? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.
सिंधुदर्ग : तब्बल 15 दिवसांच्या अज्ञातवासानंतर, भाजपचे आमदार (bjpmla) सर्वांसमोर हसत हसत आले. सिंधुदुर्ग जिल्ह्या बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यांच्या स्वागताच्या निमित्तानं नितेश राणे ( Nitesh Rane) सिंधुदुर्ग (sindhudurga) जिल्हा बँकेत आले. आणि समर्थकांनीही पुष्पगुच्छ देऊन नितेश राणेंचं स्वागत केलं. संतोष परब हल्ला प्रकरणात, नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार होती. मात्र हायकोर्टानं सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटकेपासून संरक्षण दिल्यानं, नितेश राणे कॅमेऱ्यासमोर आले. महाविकास आघाडी विशेषत: शिवसेनेला धक्का देत, भाजपनं सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर विजय मिळवला. बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे मनीष दळवी तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली. त्यांचं नितेश राणेंनी पेढा भरवून स्वागत केलं. मात्र मीडियाशी बोलणं नितेश राणेंनी टाळलं.राज्यातील नगर पंचायतींच्या निकालानंतर, एकाचवेळी बोलणार असं नितेश राणे यांनी म्हटले आहे. मात्र इतक्या दिवस नितेश राणे नेमके कुठे होते? याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे.
मारहाणीचा आरोप
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ऐन निवडणुकीच्या प्रचारावेळी नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता. त्या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर, नितेश राणेंनी हायकोर्टात धाव घेतली. आता दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला असून, सोमवारी हायकोर्ट निकाल देणार आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री राणेंनी पुन्हा एकदा, उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीकास्त्र सोडलंय. बँका चालवण्यासाठी अक्कल लागते अशी अप्रत्यक्ष टीका अजित पवारांनी निवडणुकीआधी राणेंवर केली होती.त्यामुळं आता अकलेचे धडे मिळाले असतील, असा पलटवार राणेंनी केलाय.
सोमवारी सुनावणी
सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिंकून राणेंनी शिवसेना तसंच महाविकास आघाडीला झटका दिला. मात्र आता नितेश राणेंसाठी सोमवारचा दिवस महत्वाचा आहे. कारण अटकपूर्व जामीन मिळाला नाही. तर नितेश राणेंना अटक होण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे हे गेल्या 15 दिवसांपासून नॉट रिचेबल होते. शेवटी हायकोर्टानं सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटकेपासून संरक्षण दिल्यानं, नितेश राणे कॅमेऱ्यासमोर आले.
संबंधित बातम्या
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतून महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोटो गायब, गणपतीबरोबर फक्त राणे
मिलिंद नार्वेकरांनी अशी काय खेळी केली की, दरेकर, लाड चित झाले, मुंबै बँक सेना-राष्ट्रवादीची झाली?
मुश्रीफांना का नकोय नगरचे पालकमंत्रिपद? म्हणतात जबाबदारीतून मुक्त करा…