tv9 Marathi Special : ते 5 प्रसंग जे संभाजी छत्रपतींवर बुमरँग झाले, पवार, शिवसेनेनं फडणवीसांची खेळी पलटवली?
tv9 Marathi Special : संभाजी छत्रपती राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांचे आभार मानण्यासाठी ही भेट घेतल्याचं सांगितलं गेलं. या भेटीत राज्यसभेच्या निवडणुकीवरही चर्चा झाली.
मुंबई: राजकारण हे बुद्धिबळासारखं असतं असं सांगितलं जातं. पण राजकारणात अनेकदा आपण चाललेली चाल यशस्वी होईलच असं नसतं. राजकारण हे फार वेगळं असतं. त्यात जर एखादा व्यक्ती नवखा असेल तर तो राजकारणाच्या चक्रव्युवहात अडकलाच म्हणून समजा. स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांच्याबाबत काहीसं असंच झालंय. राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर संभाजी छत्रपती यांनी राज्यसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली. ही मोर्चेबांधणी करतानाच संभाजीराजेंनी तिसऱ्या जागेची पुरेशी मत नसलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची सर्वात आधी भेट घेतली. त्यानंतर स्वराज्य पक्षाची स्थापना केली आणि अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली. संभाजी छत्रपती यांचं सर्वात आधी देवेंद्र फडणवीसांना भेटणं हे एव्हाना शिवसेनेच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे शिवसेनेने त्यांना पक्षात येण्याची ऑफर देऊन संभाजीराजेंची कोंडी करतानाच भाजपची (bjp) खेळीही उडवून लावली. या 15 दिवसांच्या घडोमोडीत संभाजीराजेंवर पाच प्रसंग बुमरँग झाले. पण हे सर्व प्रसंग बुमरँग होण्यामागे फडणवीस-राजे यांची भेट असल्याची आता चर्चा आहे. नेमक्या कोणत्या पाच प्रसंगामुळे संभाजीराजेंवर त्यांची खेळी उलटली? त्याचाच घेतलेला हा आढावा.
फडणवीसांची भेट
संभाजी छत्रपती राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांचे आभार मानण्यासाठी ही भेट घेतल्याचं सांगितलं गेलं. या भेटीत राज्यसभेच्या निवडणुकीवरही चर्चा झाली. त्यानंतर संभाजीराजे यांनी दोन दिवसातच पत्रकार परिषद घेतली आणि स्वराज्य पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी राज्यसभेसाठी अपक्ष म्हणून लढणार असल्याचंही जाहीर केलं. फडणवीसांच्या भेटीनंतर राजेंनी दोन महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. या सर्व घडामोडींकडे सत्ताधारी लक्ष ठेवून होते. विशेष म्हणजे भाजपकडे तिसऱ्या जागेसाठी पुरेसा आकडा नाही. दोन जागांवर त्यांना भाजपच्या नेत्यांना राज्यसभेत पाठवायचं असल्याने त्या जागांवर संभाजीराजेंचा विचार होऊ शकत नव्हता. हे माहीत असूनही संभाजीराजेंनी पुरेसा आकडा नसतानाही फडणवीसांची भेट घेतली. तिथेच माशी शिंकली. त्यानंतर संभाजीराजेंनी घेतलेल्या भूमिकांवर संशय निर्माण झाला नसता तर नवलच.
हम साथ है ते हम साथ नही है
संभाजीराजेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांना राज्यसभेसाठी पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय पक्षांकडून देण्यात आलेला हा पहिला जाहीर पाठिंबा होता. तोपर्यंत भाजपचे पत्तेही गुलदस्त्यात होते. मात्र, पवारांना शिवसेनेकडून मागच्या निवडणुकीचे स्मरण करून दिल्यानंतर काही दिवसातच पवारांनीही यू टर्न घेतला. मागच्यावेळी मला आणि फौजिया खान यांना राज्यसभेत जाण्यासाठी शिवसेनेने मदत केली होती. त्यावेळी शिवसेनेला पुढच्यावेळी मतदान करण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे आम्ही शिवसेना देईल त्या उमेदवाराला मतदान करणार आहोत, असं पवारांनी सांगितलं आणि संभाजीराजेंना पहिला झटका बसला.
राऊतांचा दुसरा झटका
त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंना दुसरा झटका दिला. आम्ही अपक्षांना पाठिंबा देणार नाही, असं राऊतांनी जाहीर केलं. संभाजीराजेंनी शिवसेनेत यावं. आम्हाला राज्यसभेत शिवसेनेची संख्या वाढवायची आहे. शिवाय राजघराण्यांना राजकीय पक्षांचं वावडं नाही. संभाजी छत्रपती हे खुद्द राष्ट्रवादीतून लढले होते. त्यांचे वडील शिवसेनेत होते. त्यामुळे संभाजीराजेंनी शिवसेनेत यावं, असं राऊत वारंवार सांगत राहिले. त्याच दरम्यान, कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचं नाव चर्चेत आलं. त्यानंतर संजय पवारांच्या भोवती राज्यसभेच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आणि संभाजीराजेंच्या अपक्ष उभं राहण्याच्या खेळीला खिळ बसली.
या शिवबंधन बांधून घ्या, शिवसेनेची ऑफर
या घडामोडी घडत असतानाच संभाजी छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्यसभेबाबत चर्चा झाली. आपण अपक्ष लढत असून तुम्ही पाठिंबा द्यावा, अशी विनंती संभाजी छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना केली. तर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेत या आणि राज्यसभेवर जा, असं सांगितलं. त्यानंतर शिवेसनेऐवजी महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करा म्हणून संभाजीराजेंनी प्रस्ताव दिला. तर शिवसेना पुरस्कृत उमेदवार करता येईल का हे मी सहकाऱ्यांशी विचारून सांगतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ही चर्चाही फिस्कटली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ट्रायडंटमध्ये शिवसेना नेते संभाजीराजेंना भेटले आणि त्यांनी संभाजीराजेंना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. संभाजीराजेंनी ही ऑफर नाकारली. एव्हाना भाजपनेही अपक्ष लढला तरच पाठिंबा देऊ अशी अट मीडियातून जाहीर केली. त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांचा संभाजीराजेंना निरोप गेला. उद्या दुपारी वर्षावर या आणि शिवबंधन बांधा, असा निरोप पाठवला गेला. त्याला संभाजीराजेंनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संभाजीराजे राज्यसभेत जाणं धुसर झालं.
अखेरचा निर्णय
शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितला. संजय पवारांनी अर्ज भरल्यानंतर संभाजी छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्र्यांसोबतची बंददाराआडील चर्चा उघड केली. मुख्यमंत्री मला शिवसेना पुरस्कृत उमेदवार करायला तयार होते. हे मी शिवाजी महाराजांच्या साक्षीने सांगायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांनीही सांगावं, असं आव्हानच संभाजीराजेंनी केलं. त्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. तर, सहकाऱ्यांशी चर्चा करून शिवसेना पुरस्कृत उमेदवार करायचे की नाही याबाबत निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सांगितल्याचं राऊत यांनी सांगितलं.
खेळीमागे फडणवीस?
दरम्यान, संभाजी छत्रपती यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज वेगळाच गौप्यस्फोट केला. संभाजीराजेंना अपक्ष लढवण्यामागे फडणवीसांचीच खेळी होती. बहुजन मतात फूट पाडण्याचा हा डाव होता, असं श्रीमंत शाहू महाराज यांनी सांगितलं. त्यामुळे या सर्व खेळीमागे फडणवीस होते आणि पवार आणि शिवसेनेने ही खेळी उलटवल्याचं राजकीय सूत्रांनी सांगितलं.