Sharad Pawar Vs Brahmin: का ब्राह्मणांनी पवारांचं निमंत्रण नाकारलं? ते 7 प्रसंग जे ब्राह्मण संघटना विसरणे अशक्य
Sharad Pawar Vs Brahmin: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाचे प्रशिक्षण दिल्याचा दावा केला होता. त्यावर राष्ट्रवादीतून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात ब्राह्मण विरुद्ध राष्ट्रवादी (ncp) असं चित्रं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी केलेले आरोप असो, केतकी चितळे प्रकरण असो की राष्ट्रादीचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची विधाने असो या मुळे वादंग निर्माण झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष हा ब्राह्मण विरोधी असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ब्राह्मणांना चर्चेसाठी पाचारण केलं होतं. मात्र, ब्राह्मण महासंघाने पवारांचं हे निमंत्रण धुडकावून लावलं आहे. राष्ट्रवादीची ब्राह्मण विरोधी भूमिका, त्यातही अमोल मिटकरी आणि भुजबळ यांचे ब्राह्मणांविरोधातील विधानांना आक्षेप घेत ब्राह्मण महासंघाने या बैठकीचं निमंत्रण धुडकावून लावलं. एकूणच राष्ट्रवादीच्या आजवरच्या सात भूमिकांवर ब्राह्मण समाज नाराज आहे. राष्ट्रवादीच्या या सात वादग्रस्त भूमिकांवर टाकलेला प्रकाश.
शिवरायांचे गुरु रामदास स्वामी
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाचे प्रशिक्षण दिल्याचा दावा केला होता. त्यावर राष्ट्रवादीतून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. राष्ट्रवादीचे नेते अमोल मातेले यांनी यावर आक्षेप घेतला होता. शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ हेच शिवाजी महाराजांना गुरुस्थानी होते. त्यांनीच शिवाजी महाराजांना दांडपट्टा आणि तलवारबाजीचे धडे दिले. शहाजी राजे आणि जिजाऊ माँसाहेब यांना सर्व कला अवगत होत्या. महात्मा जोतिराव फुले, शाहीर अमरशेख, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी इतिहासाची जी काही मांडणी केली आहे. त्यात याचे सत्य आणि वास्तवावर आधारित दाखले सापडतात, असे राष्ट्रवादीचे नेते अॅड.अमोल मातेले यांनी सांगितलं होतं. तर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला जाज्वल्य इतिहास वेगवेगळ्या माध्यमांतून आणखी प्रभावीपणे मांडण्याची गरज आहे, असं खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं होतं. चुकीच्या ऐकीव माहितीवर किंवा चुकीच्या फीडवर त्यांनी विधान केलेल असावे, अशी शक्यताही कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
लाल महालातील शिल्प हटवण्याचा वाद
लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचं शिल्प हटवण्यात आलं होतं. त्यालाही राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. दहा वर्षापूर्वी पुणे पालिका आणि पोलिसांनी पुतळा हटवण्याची कारवाई केली होती. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. मग त्यांचा पुतळा कशाला हवा? असा सवाल काही संघटनांनी केला होता. त्याला राष्ट्रवादीनेही समर्थन दिलं होतं. त्याचा राग ब्राह्मण संघटनांच्या मनातून अजूनही गेलेला नाही.
आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करु लागले
भाजपने संभाजी छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. त्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला होता. आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करू लागल्याचं विधान शरद पवार यांनी केलं होतं. 2016मध्ये शरद पवारांनी कोल्हापुरात हे विधान केलं होतं. त्यावरून वादंग निर्माण झालं होतं. भाजपने पवारांच्या या विधानाचा समाचारही घेतला होता.
संभाजी ब्रिगेडविरोधात मवाळ भूमिका
संभाजी ब्रिगेड या आक्रमक संघटनेने सातत्याने ब्राह्मणांना टार्गेट केलं आहे. मात्र, तरीही राष्ट्रवादीने संभाजी ब्रिगेडविरोधात मवाळ भूमिका घेतली आहे. लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याचं प्रकरण असो, राम गणेश गडकरींच्या पुतळ्याविरोधातील आंदोलन असो की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचं प्रकरण असो, प्रत्येक वेळी संभाजी ब्रिगेडने त्याला विरोध केला. मात्र, प्रत्येक प्रकरणात राष्ट्रवादाने संभाजी ब्रिगेडबाबत मवाळ भूमिका घेतली.
मिटकरी, भुजबळांची वादग्रस्त वक्तव्य
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि छगन भुजबळ यांनी सातत्याने ब्राह्मणविरोधी वक्तव्य केलं आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये एका सभेत मिटकरी यांनी ब्राह्मणांवर जोरदार टीका केली होती. धुपमं दीपम नवैद्यम नमस्कारमं नमस्करोती. डोळ्याला पाणी लावा. हात पुढे करा. तुमचा हात माझ्या हातात द्या. तुमच्या पत्नीचाही हात माझ्या हातात द्या. (इकडे जयंत पाटील यांनी पुन्हा जोरजोरात हासायला सुरुवात केली.) म्हणा मम् भार्या समर्पयामि. आचमन करा. धुपमं दीपम नवैद्यम नमस्कारमं नमस्करोती. मम भार्या समर्पयामि. मी त्या नवरदेवाच्या कानात सांगितलं. अरे येड्या, ते महाराज असं म्हणतायत मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको, समर्पयामि म्हणजे घेऊन जा. आरारा…असं विधान मिटकरी यांनी केलं होतं. त्यावर ब्राह्मण संघटनांचा सर्वाधिक आक्षेप आहे.
अभिनेत्री केतकी चितळे यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्याचा संबंध भुजबळांनी थेट मनुवादाशी जोडला होता. शरद पवारांवर सोशल मीडियातून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजे. अशा लोकांवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. अभिनेत्री अथवा कुणीही असो, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हे चीड आणणारे आहे. यामागे मनुवाद आहे का? हे तपासलं पाहिजे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली होती.
पुणेरी पगडीऐवजी फुले पगडी
जून 2018 मध्ये पुण्यात राष्ट्रवादीचा मेळावा झाला होता, त्यावेळी शरद पवार यांनी पुणेरी पगडी नाकारली होती. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात पेशवेकालीन पगडी नाही, तर फुले पगडीनेच स्वागत करा, असे आदेश पवारांनी दिले होते. तसंच त्यांनी त्यावेळी छगन भुजबळ यांचा पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडीने स्वागत केलं होतं. त्यामुळेही ब्राह्मण संघटना संतापल्या होत्या.
राम गणेश गडकरी पुतळ्याची विटंबना
3 जानेवारी 2017 च्या मध्यरात्री संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा तोडण्यात आला होता. ‘राजसंन्यासी’ नाटकातून राम गणेश गडकरी यांनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे हा पुतळा तोडण्यात आला होता. पुण्यात संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांच्या तोडलेल्या पुतळ्यावरुन ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला होता. त्यांनी हा पुतळा बसवण्याची मागणी केली होती.