5 राज्यात काँग्रेस साफ होणार? पंजाबमध्ये ‘आप’ सरकार? 2024 ला भाजपसाठी मार्ग सुकर? वाचा सर्वेक्षणाचं सविस्तर विश्लेषण
सर्व पक्षांना माहित आहे की निवडणुका हा शक्यतांचा खेळ आहे आणि मतमोजणी होईपर्यंत विजयाची शक्यता आहे. काँग्रेस हळूहळू स्वत:ची जमीन गमावतेय हे वास्तव आहे आणि असं असतानाही ती राखण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पंजाबमध्ये कॅप्टन आणि सिद्धू एकमेकांच्या पायात पाय अडकवण्याची एकही संधी सोडत नाहीयत. त्याचा परिणाम आगामी लोकसभेलाही काँग्रेसला भोगावा लागणार हे निश्चित.
काँग्रेस पक्षाची (Congress party) अस्वस्थता वाढली असावी, साहजिकच. पुढील वर्षाच्या सुरुवातीला पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Assembly Election) होतायत. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात भाजपचे (BJP) सध्या ज्या राज्यांमध्ये सरकार आहे त्या सर्व राज्यांमध्ये निवडणुका जिंकतोय. पंजाब (Punjab)मध्ये काँग्रेस पक्ष निवडणूक हरण्याच्या मार्गावर आहे.जनमत चाचण्या नेहमीच अगदी बरोबर ठरतात असं नाही पण मतदारांच्या मनाचा अंदाज त्यातून येऊ शकतो. ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे.
पंजाबमध्ये केजरीवाल बल्ले बल्ले सी-व्होटर (c voter) नावाच्या कंपनीने एका खासगी टीव्ही चॅनेलसाठी हे सर्वेक्षण केलय. त्यानुसार पंजाबमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल. यात आम आदमी पक्षाला बहुमतासाठी काही जागा कमी पडतील असा अंदाज आहे. सर्वेक्षणानुसार, गेल्या निवडणुकीत 20 जागांसह मुख्य विरोधी पक्ष बनलेल्या ‘आप’ला 117 सदस्यांच्या विधानसभेत 51 ते 57 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर राज्याचा सत्ताधारी काँग्रेस पक्ष 38 ते 46 जागा जिंकून दुसरा क्रमांक पटकावेल. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 77 जागा जिंकल्या. शिरोमणी अकाली दलाला 16 ते 24 जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपा खाते उघडणार नाही किंवा केवळ एखाद्याच जागेची शक्यताय.
उत्तरप्रदेशात पुन्हा योगी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपकडे पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळेल अशी शक्यता आहे. भाजपसाठी गूड न्यूज गोवा आणि मणिपूरमध्ये आहे, जिथे 2017 मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. काँग्रेसने येथे सर्वात मोठा पक्ष निवडला होता, पण सरकार स्थापन करण्यात भाजप यशस्वी झाला. उत्तर प्रदेशातील 312 जागांऐवजी भाजप यावेळी 259 ते 277 जागा जिंकेल, असा सी-व्होटरचा अंदाज आहे. जे 403 सदस्यांच्या विधानसभेत स्पष्ट बहुमत असेल. समाजवादी पक्षाला 109 ते 117, बसपला 12 ते 16 जागा आणि काँग्रेस पक्षाला 3 ते 7 जागांचा अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आलाय.
काँग्रेसनं पंजाब गमावलं तर पंजाब आणि उत्तर प्रदेशकडे पाहुया. काँग्रेस पक्षासाठी पंजाबमधील विजय खूप महत्त्वाचा आहे. पंजाब हे तीन राज्यांपैकी एक आहे जिथे कॉंग्रेस पक्षाचे स्वत: सरकार आहे. पंजाबमधील निवडणुका गमावून दुसऱ्या राज्यात सत्ता मिळवण्यात अपयश आल्यास, 2024 च्या लोकसभा निवडणुका जिंकण्याचे काँग्रेस पक्षाचे स्वप्न भंगू शकते. राहुल गांधींचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न दिवास्वप्न ठरू शकतं. उत्तर प्रदेशात भाजपसाठी विजय खूप महत्त्वाचा आहे. एकर उत्तर प्रदेशातून भाजपचे सर्वाधिक 80 लोकसभा खासदार निवडूण आलेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीचे खासदार आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये कृषी कायद्यांविरूद्ध शेतकरी आंदोलन सुरु आहे. 9 महिन्यांहून अधिक काळ सामान्य जीवनावर त्याचा परिणाम झालाय. उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा भाजपा सत्तेवर आली तर पुढील लोकसभा निवडणुका जिंकण्याचा भाजपचा मार्ग तर मोकळा होईल. पण भाजपाच्या दाव्याप्रमाणे किसान चळवळ राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि त्यांना जनतेचा पाठिंबा नाही, हेही सिद्ध होईल.
जनमत चाचण्याही चुकतात तसे, जनमत चाचण्या कधीही पूर्णपणे अचूक नसतात. सी-व्होटरचा पंजाबमध्ये अंदाज चुकीचा ठरला होता. पंजाबमध्ये 2017 मध्ये 4 फेब्रुवारी रोजी मतदान झाले आणि त्यापूर्वीच सी-व्होटर सर्वेक्षण करण्यात आले. ज्यात कंपनीने ‘आप’च्या विजयाचा अंदाज वर्तविला होता. सर्वेक्षणानुसार, आपला 63 जागा, काँग्रेस पक्ष 43 आणि अकाली दल-भाजप युतीला 11 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला. पण निकाल अगदी उलट आला. काँग्रेस पक्षाला 77 जागा मिळवून एकतर्फी विजय मिळवता आला आणि आपचा विजयी रथ 20 जागांवर थांबला. पंजाबमध्ये केवळ सी-व्होटरचेच सर्वेक्षण चुकीचे ठरले असे नाही. सी-व्होटरव्यतिरिक्त आणखी आठ कंपन्यांनी जानेवारी-फेब्रुवारी 2017 दरम्यान सर्वेक्षण केले आणि केवळ एका सर्वेक्षणात काँग्रेस पक्षाला बहुमत मिळत असल्याचे दिसून आले. आम आदमी पक्ष किमान तीन सर्वेक्षणांमध्ये बहुमताने सरकार स्थापन करेल असे वाटत होते, परंतु केजरीवाल बहुमतापासून 39 जागा दूर होते. उत्तर प्रदेशात 11 सर्वेक्षणे करण्यात आली आणि अवघ्या एका सर्वेक्षणात भाजपाला 202 जागा जिंकत असल्याचे दाखवले. जे सर्वात कमी बहुमताचे आकडे होते. विशेष म्हणजे सपा आणि काँग्रेस हे इतरांच्या पुढे असल्याचे बहुतांश सर्वेक्षणात दाखवले गेले होते.
उत्तरप्रदेशचा अंदाज अवघड पंजाबप्रमाणेच कोणत्याही ओपिनियन पोलला उत्तर प्रदेशातील जनतेच्या मनःस्थितीचा अंदाज घेण्यात यश मिळाले नव्हते. भाजपाला दोन तृतीयांशपेक्षा जास्त जागा मिळणार आहेत, याची कोणालाही कल्पना नव्हती. भाजपने केवळ 384 जागा लढवल्या होत्या आणि बाकी 19 जागा एनडीएच्या इतर घटकांना सोडल्या होत्या. भाजपचे 384 पैकी 312 उमेदवार यशस्वी झाले आणि उत्तर प्रदेशची निवडणूक पूर्णपणे एकतर्फी झाली. येत्या काही दिवसांत आणखी सर्वेक्षण होतील आणि वेगवेगळी आकडेवारी समोर येईल. त्यामुळे आपल्याला निवडणुकीत रस राहील. सर्वेक्षणाचा नमुना, आकार हे जनमत चाचण्या योग्य सिद्ध न होण्याचे एक प्रमुख कारण होते. पंजाबमध्ये सुमारे 20 दशलक्ष मतदार आहेत आणि सी-व्होटरने केवळ 13,000 लोकांचीच मतं अजमावली. सँपल साईज कमी असल्यामुळे चुका होण्याची शक्यता अधिक. कधी कधी मतदार एकतर निवडणुकीपूर्वी योग्य वेळी निर्णय घेतात. किंवा कधी कधी सर्वेक्षण करणाऱ्याला जाणूनबुजून चुकीची माहिती देतात.
जनतेचा मूड बदलू शकतो सर्वेक्षणाचा आकडा भाजपच्या बाजूने आहे आणि काँग्रेसच्या विरोधात आहे. पण यावर ना भाजप खूश होऊ शकतं ना काँग्रेसनं शोक करावा. निवडणूक अजून 5-6 महिन्यांवर आहे आणि दरम्यान मतदारांचा मूड बदलू शकतो. परंतु काँग्रेस पक्षासाठी संकेत नक्कीच चांगले नाहीत. गेल्या वर्षी पंजाबमधून किसान चळवळ सुरू झाली आणि काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच आंदोलक शेतकऱ्यांना उघडपणे पाठिंबा देत आहे. त्याचा किती फायदा होणार हे महत्वाचं आहे. पंजाबमधील अंतर्गत कलह वेळीच संपुष्टात आणण्याच्या पक्षाच्या सुस्तपणामुळे आणि सततच्या गोंधळामुळे पक्षाला झालेल्या नुकसानाची माहिती काँग्रेस हायकमांडला नाही, असे नाही. पण काँग्रेसचा नेतृत्वाचा संभ्रम उघडपणे दिसतोय. यापुढे मतभेद विसरून एकत्र येऊन जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करणे हे काँग्रेस पक्षावर अवलंबून आहे.
सर्व पक्षांना माहित आहे की निवडणुका हा शक्यतांचा खेळ आहे आणि मतमोजणी होईपर्यंत विजयाची शक्यता आहे. काँग्रेस हळूहळू स्वत:ची जमीन गमावतेय हे वास्तव आहे आणि असं असतानाही ती राखण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पंजाबमध्ये कॅप्टन आणि सिद्धू एकमेकांच्या पायात पाय अडकवण्याची एकही संधी सोडत नाहीयत. त्याचा परिणाम आगामी लोकसभेलाही काँग्रेसला भोगावा लागणार हे निश्चित.
Video| शिक्षकांचा मार खाल्यामुळे भाषण द्यायला लागलो, नाहीतर शिकलोच नसतो: नितीन गडकरी
पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली अन् अख्खं गाव रडलं, संजय अहिरेंच्या निरोप समारंभाची एकच चर्चा