Photos : वयाच्या 26 वर्षापर्यंत क्रिकेटर ते उपमुख्यमंत्री प्रवास, तेजस्वी यादव यांचं शिक्षण काय?
Follow us
बिहारच्या राजकारणात दबदबा असलेल्या लालू यादव यांचे उत्तराधिकारी तेजस्वी यादव हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. उत्तम वक्ते आणि राजकारणाची चांगली समज असलेले तेजस्वी यादव यांच्या शिक्षणावरुन विरोधकांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांना मोठं यश मिळताना दिसत आहे. त्यामुळे राजकारणात कसलेला या खेळाडूविषयी अनेकांना उत्सुकता तयार झालीय.
लालू यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1989 रोजी झाला होता. क्रिकेटरमध्ये करिअर करताना त्यांचं शिक्षण मात्र मागेच राहिलं. 2015 मध्ये ते दीड वर्षे नितीश कुमार सरकारमध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री होते. सध्या ते बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा लहान मुलगा तेजस्वी यादव वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी बिहारचे उपमुख्यमंत्री झाले होते. राजकारणात येण्याआधी ते क्रिकेट क्षेत्रात आपलं नशिब आजमावत होते. त्यांनी विजय हजारे चषकात झारखंडचं प्रतिनिधित्वही केलं होतं.
तेजस्वी 2008 ते 2012 पर्यंत 4 वर्षे दिल्ली डेअरडेविल्स IPL टीमचा भाग होते. मात्र, त्यांना आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. याचा उल्लेख लालू प्रसाद यादव यांनी थेट संसदेतही केला होता. तेजस्वी यांना खेळण्याची संधी देण्याऐवजी इतर खेळाडूंना पाणी बॉटल देण्यास सांगितले जात असल्याची तक्रार त्यांनी केली होती.
शिक्षणाबाबत तेजस्वी आपले वडील लालू प्रसाद यादव यांच्या खूप मागे आहेत. लालू यादव यांनी वकिलीचं शिक्षण घेतलंय. मात्र, तेजस्वी केवळ 9 वी पास आहेत. क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी त्यांनी शाळा सोडली होती. त्यांचे भाऊ तेजप्रताप हे 12 वी पास आहेत.
तेजस्वी यांना क्रिकेटमध्येच आपलं करिअर करायचं होतं. मात्र, लालू प्रसाद चारा घोटाळ्याच्या आरोपांखाली तुरुंगात गेल्यानंतर तेजस्वी यांची राजकारणात चर्चा होऊ लागली.
तेजस्वी यादव पहिल्यांदा 2015 मध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या तिकिटावर राघोपूर मतदारसंघातून निवडून आले. यानंतर ते नितीश सरकारमध्ये नोव्हेंबर 2015 आणि जुलै 2017 मध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री झाले.