दिल्लीचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने पुन्हा एकदा पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. हैदराबादविरुद्धच्या क्वालिफायर 2 सामन्यात कगिसोने एकूण 4 विकेट्स घेतल्या. यासह त्याने पर्पल कॅप मिळवली आहे. कगिसोने आयपीएलच्या या मोसमातील 14 सामन्यात एकूण 29 विकेट्स घेतल्या आहेत. तर जसप्रीत बुमराहने 27 विकेट्स घेतल्या आहेत. तर पर्पल कॅपच्या शर्यतीत ट्रेन्ट बोल्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे. बोल्टने या मोसमात एकूण 22 विकेट्स घेतल्या आहेत.
या मोसमातील अंतिम सामना 10 नोव्हेंबरला म्हणजेच आज खेळण्यात येणार आहे. मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यात हा सामना खेळण्यात येणार आहे. रबाडा आणि बुमराह यांच्यात पर्पल कॅपसाठी केवळ 2 विकेट्सचे अंतर आहे. त्यामुळे पर्पल कॅपसाठी या दोन्ही गोलंदाजांमध्ये अंतिम सामन्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
तर ऑरेंज कॅप अजूनही केएल राहुलकडेच कायम आहे. पंजाबचे यंदाच्या मोसमातील आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र त्यानंतरही इतर कोणत्याही फंलदाजाला ऑरेंज कॅप मिळवण्यात यश आलेलं नाही. केएलच्या नावावर या मोसमात सर्वाधिक धावांची नोंद आहे. केएलने या मोसमातील एकूण 14 सामन्यात 670 धावा केल्या आहेत.
शिखर धवनकडे ऑरेंज कॅप मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात शिखरला ही कामगिरी करण्याची संधी आहे. शिखरला ऑरेंज कॅपसाठी एकूण 67 धावांची आवश्यकता आहे.