धम्मचक्र प्रवर्तन दिन बौद्ध धर्मीयांसाठी एक खास सण आहे. हा दिवस धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन म्हणूनही ओळखला जातो. कारण याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला.
भारतभरातील बौद्ध अनुयायी या वर्षी 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करत आहेत. दरवर्षी उत्साहात साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन, या वर्षी साधेपणाने साजरा होतोय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याने 14 ऑक्टोबर या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बौद्ध धम्माचे अनुयायी दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने जमतात. या वर्षीचा हा सोहळा नागपूरमध्ये साधेपणाने साजरा होतोय.
दीक्षाभूमीवर साजरा होणारा या वर्षीचा हा 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे लाखो अनुयायी होते. त्यांच्या अनुयायांनीसुद्धा त्यावेळी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती.
देशातील तसेच राज्यातील कोरोना संसर्ग लक्षात घेऊन, नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने, या वर्षीचा धम्मचक्र प्रवर्तन दिन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी दिली आहे.