भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने सुवर्णकमाई केली आहे. विनेशने महिलांच्या 53 किलोच्या गटामध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे. यासह तिने रॅकिंगमध्येही अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
रविवारी 7 मार्चला मॅट्टेओ पेलिकोन कुस्ती स्पर्धेतील अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात विनेशची गाठ कॅनडाच्या डायना मेरी हेलन वीकरसोबत पडली.
या सामन्यादरम्यान विनेश डायनावर अखेरपर्यंत वरचढ राहिली. विनेशला एकही पॉइँट घेऊ दिला नाही. विनेशने डायनाचा 4-0 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवला. या विजयासह विनेशने रँकिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेआधी विनेश ही तिसऱ्या क्रमांकावर होती.
ही तिची दुसरी सुवर्णकमाई ठरली. विनेशने मागील आठवड्यात कीवमध्ये सुवर्णकमाई केली होती.
विनेश टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे.
सलग दुसऱ्यांदा गोल्डन मेडल मिळवल्याने विनेशचा विश्वास दुणावला आहे. तसेच या विजयामुळ तिला टोकियो ऑलिम्पिकसाठीच्या दृष्टीने आपली वाटचाल योग्य दिशेने चालत असल्याची पोचपावतीही मिळाली.
या अशा कामगिरीमुळे विनेशकडून ऑलिम्पिकमध्येही अशाच प्रकारच्या चमकदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
विनेशला गेल्या वर्षी 28 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्या कोरोनालाही विनेशने चितपट केलं होतं.
विनेशला राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्ताने खेळ रत्न पुरस्कार मिळण्याच्या आधीच्या एक दिवसापूर्वी कोरोना झाला होता. यामुळे तिच्या फिटनेसवर परिणाम झाला होता. पण या सर्व संकटांना चितपट देत विनेशने जोरदार कमबॅक केलं. तसंच यशस्वी कामगिरीही केली.