आज 11 मार्च महाशिवरात्रीचा मोठा सण. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला ‘महाशिवरात्री’ साजरी केली जाते. शास्त्रात हा दिवस खूप महत्वाचा असल्याचे सांगितले जाते
मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यातील रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा विचार करत या वर्षी महाशिवरात्री हा उत्सव अत्यंत साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन गृह विभागाकडून करण्यात आलं आहे.
त्यामुळे राज्यभरातील महत्त्वाची सर्व शिव मंदिरं आज भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त बाबूलनाथ मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. काल 10 मार्च सकाळी 7.30 ते 12 मार्च सकाळी 7.30 वाजेपर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहे. पण भाविकांना दर्शनासाठी ऑनलाईन सुविधा मिळणार आहे.
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात यंदा भाविकांना प्रवेश नसल्यानं मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळतोय. दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिरात किमान 4 ते 5 लाख भाविक भगवान महादेवाचं दर्शन घेत असतात.
काल रात्री 12 वाजता मंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या पाटील कुटुंबीयांनी मंदिरात प्रथेप्रमाणे आरती केली. हे शिवमंदिर तब्बल 961 वर्ष जुनं असून इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदिर भाविकांविना ओस पडलंय.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं पुण्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आज महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे. मात्र, ही महाशिवरात्री भक्तांविना साजरी होत आहे.
महाशिवरात्रीनिमित्त सर्वच मंदिरात आकर्षक रोषणाई आणि फुलांची आरास करण्यात आली आहे.
तर नाशकातील महाशिवरात्रीच्या मंदिरात त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरावर खास लेझर शो आयोजित करण्यात आला आहे. रात्रीच्या सुमारास मंदिरावर लेझर शोचा झगमगाट करण्यात आला आहे.
देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त मोठी यात्रा असते महादेव-पार्वतीची वरात रथामधून काढली जाते. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आली.
नागपूर जिल्ह्यात महाशिवरात्रीच्या यात्रेवर बंदी घालण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त मंदिरात होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
साताऱ्यातील क्षेत्रमाहुली येथे रामेश्वर मंदिरावर महा शिवरात्रीच्या पुर्व संध्येला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती.
अनेक ठिकाणी महादेव मंदिरासमोर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांनी मंदिरामध्ये येऊ नये, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.
मंदिरात गर्दी होणार नाही, याकडे प्रशासनाचं लक्ष आहे. मंदिरातील गर्दीमुळे कोरोना संक्रमणाची भिती असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.