झारखंडच्या रांचीमधील कांची नदीवर तब्बल 13 कोटी रुपये खर्च करुन बांधलेला पूल यास चक्रीवादळाच्या तडाख्यात कोसळलाय. हा पूल रांचीतील तडाम, बुंडू आणि सोनाहातू या भागांना जोडतो. काल संध्याकाळी हा पूल कोसळला.
बंगालच्या उपसागरात आलेल्या यास चक्रीवादळानंतर सातत्याने मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे कांची नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अशात इतका मोठा आणि नवा पूल कोसळल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय.
जवळपास 600 मीटर लांबीचा पूल अचानक कोसळल्यानं दोन्ही बाजूचे नागरिक अडकून पडले आहेत. या पुलाच्या बांधकामात अनेक त्रुटी होत्या. या पुलाच्या पिलरचा पाया मजबूत नव्हता. त्यामुळे पहिल्याच मोठ्या पावसात पिलर खडून हा पूल कोसळल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय.
कांची नदी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जातो. तसंच या पुलाचं बांधकाम करणाऱ्या कंपनीने बांधलेला अजून एक पूल यापूर्वी कोसळला आहे. त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी स्थानिक आमदार विकास मुंडा यांनी केलीय.
कांची नदीवरील कोसळलेल्या पुलाचं साधं औपचारिक उद्घाटनही झालं नव्हतं, असं इथले ग्रामस्थ सांगतात. तसंच अवैध वाळू उपसा हे देखील पूल कोसळण्यामागे मुख्य कारण असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.