Marathi News Photo gallery Photos of celebration of savitri utsav on birth anniversary of savitribai phule in maharashtra
Photos : ‘घराला तोरण, दारात पणती आणि गोडधोड जेवण’, महाराष्ट्रात ‘सावित्री उत्सवाला’ जोरदार प्रतिसाद
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात घरोघरी 'सावित्री उत्सव' साजरा करण्यात आला.
Follow us
भारतात महिलांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात घरोघरी ‘सावित्री उत्सव’ साजरा करण्यात आला.
दारासमोर रांगोळी, दरवाज्याला फुलांचे तोरण, दारात आकाश कंदील, उंबऱ्यावर ज्ञानाची एक पणती आणि घरात गोडधोड करून हा उत्सव साजरा केला गेला. यात मंत्री, कलाकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेतलेला पाहायला मिळाला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी देखील आपला चिरी लावलेला फोटो पोस्ट करत सावित्रीबाईंना अभिवादन केलं.
अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी देखील दरवाज्यात रांगोळी काढून त्यावर ज्ञानाचं प्रतिक म्हणून एक पणती लावली आणि सावित्री उत्सव साजरा केला.
पालघरमध्ये देखील राष्ट्र सेवा दलाच्या वतीने दिवे लावत सावित्री उत्सव साजरा केला.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातच नाही, तर अगदी अमेरिकेतही सावित्री उत्सव साजरा करण्यात आला. सुप्रिया महेश भोर-नाईकवाडी यांनी अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे दारात तोरण, रांगोळी, पणती लावून सावित्री उत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी आपल्या मुलांचे सावित्रीबाईंच्या वेशातील सुंदर फोटोही शेअर केले. त्यांनी मागील वर्षी देखील इतर मैत्रिणींना घेऊन सावित्री उत्सव साजरा केला होता.
राष्ट्र सेवा दलाच्या सेवापथकाने मिरज शासकिय महाविद्यालय परिसरात परिसर स्वच्छता करुन सावित्री उत्सव साजरा करण्यात आला.
मुंबईतील उत्कर्षा मल्ल्या यांनी मदतनीस सख्यांचा सन्मान करुन सावित्री उत्सव साजरा केला. यावेळी घरात गाजराचा हलवा व पुरण हा गोडाचा बेतही करण्यात आला.
पुण्यात सावित्री उत्सवाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्यावरील ‘सावित्री वदते’ या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं.
अहमदनगरमध्ये सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बुलबुल यांच्या नेतृत्वात सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या नावाने नगरमधील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुण्यातील एस. एम. जोशी फाऊंडेशन येथेही कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करुन सावित्री उत्सव साजरा करण्यात आला.
येवला येथील मायबोली निवासी कर्ण बधीर मुलांच्या शाळेतही सावित्री उत्सव साजरा झाला.
अहमदनगरमधील अकोले तालुक्यातही महिलांना सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती देत सावित्री उत्सव साजरा करण्यात आला.