संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा या दोघांनी कोरोना विरुद्ध लढा देण्याचा निर्धार केला. दोघांनी स्वत:पासून सुरुवात केली. या दोघांनी 2 कोटींची आर्थिक मदत जाहीर केली. त्यानंतर या दोघांनी इतरांना मदतीसाठी आवाहन केलं. अवघ्या काही दिवसांमध्ये विरुष्काच्या आवाहनाला लोकांनी भरभरुन दाद दिली आहे.
या कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी आतापर्यंत 11 कोटींची रक्कम जमली आहे. या अभियानांतर्गत जमा होणारी रक्कम कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
विरुष्काने सुरुवातीला केटो संस्थेच्या सोबतीने 7 कोटी रक्कम जमा करण्याचा निर्धार केला होता. मात्र आता त्यापेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. विरुष्काच्या आवाहनानंतर एमपीएल स्पोर्ट्स फाऊंडेशननेही 5 कोटींची मदत केली.
विरुष्काने गेल्या 2 वर्षात विविध समाजपयोगी कार्यसाठी 5 कोटींची आर्थिक मदत केली आहे. विरुष्काने कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळेस 3 कोटींची मदत केली होती. तर या वेळेस दोघांनी 2 कोटींची मदत जाहीर केली.
कोहलीने काही दिवसांपूर्वी मदतीची घोषणा करताना म्हणाला होता की, "आपला देश यावेळेस अडचणीतून जात आहे. यावेळेस आपण एक होण्याची आणि अधिकांचे प्राण वाचवण्याची आवश्यकता आहे. वर्षभरापासून अनेक लोकं अडचणीतून जात आहेत. हे पाहून आम्हाला यातना होत आहेत."