संगमनेर तालुक्यात दक्षिण दिशेला असणारा हरिश्चंद्र बालाघाट रांगेतील "ढुम्या" डोंगर हा त्याच्या रुबाबदारपणासाठी आणि आखीवरेखीवपणासाठी ओळखला जातो.
Follow us
संगमनेर तालुक्यात दक्षिण दिशेला असणारा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेवर नैसर्गिक सौदर्याची खाणच आहे.
समोरच्या बाजूने आपल्या भव्यतेने ट्रेकिंग करणाऱ्यांना खुणावणारा हा डोंगर सध्या पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या डोंगरावर चहुदिशांनी हिरवळीची जादू आहे. अनेक प्रकारची झाडं-झुडपं, वेगवेगळ्या प्रकारची रानफुलं आणि वेगवेगळे पशुपक्षी ही पर्यटकांची मेजवानीच या ठिकाणी पाहायला मिळते.
ट्रेकिंग करण्यासाठी हा संगमनेर तालुक्यातील हा चांगला डोंगर आहे. ट्रेकिंग करताना साधारणपणे 2-3 डोंगर चढ ओलांडून जावं लागतं. मध्ये मध्ये या डोंगरावर काही पठार भागही आहे. या ठिकाणी हिरव्यागार गवताची दाट चादर पसरलेली दिसते.
ज्यांना ट्रेकिंग न करता केवळ उंचावरुन आजूबाजूच्या निसर्गाच्या सौदर्यांचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी डोंगराच्या मागच्या बाजूने गाडी वाट देखील उपलब्ध आहे.
या वाटेने अगदी काही वेळेत डोंगराची निम्म्याहून अधिक उंची गाठता येते. मात्र, शेवटी काही उंचीपर्यंत पायीच जावं लागतं. त्यामुळे गाडीने येणाऱ्यांना देखील ढुम्या डोंगर आपली भव्यता अनुभवायला लावतो.
या डोंगरावर गाडीने येऊन आजूबाजूच्या विस्तृत परिसराची निसर्गाने फुललेली दृश्य डोळ्यात साठवणे असो की ट्रेकिंग करत या भव्य डोंगराचे चढउतार अनुभवत निवांत चढाई करणे असे दोन्ही मार्ग पर्यटकांना भरभरुन आनंद देतात.
या डोंगराच्या शिखरावर एक छोटंसं मंदिर आहे. ते सध्या मोडकळीस आलं असलं तरी ते डोंगराचं सौंदर्य वाढवणारं आहे.
हेच मंदिर या डोंगराची ओळख बनलंय. हे ढुम्या खंडोबाचं मंदिर आहे. यावरुनच डोंगराला ढुम्या डोंगर असं नाव पडलं आहे.
एकूणच हे संगमनेरमधील सर्वोत्तम डोंगरांपैकी एक ठिकाण आहे.
हे पर्यटन स्थळ फार प्रसिद्ध नाही.
त्यामुळे इतर ठिकाणी असणारी पर्यटकांची भरमसाठ गर्दी येथे नाही.
त्यामुळे या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठीचा निवांतपणा अगदी मुबलक आहे.
तुम्ही जर संगमनेर तालुक्यात असाल किंवा पुणे नाशिक महामार्गावरुन प्रवास करत असाल तर या ठिकाणाला आवर्जून भेट देऊ शकता.
पुणे-नाशिक महामार्गावरुन हे ठिकाण अगदी जवळ आहे.
येथे टु व्हिलर आणि फोर व्हिलर दोन्ही प्रकारच्या गाड्या अगदी व्यवस्थित पोहचतात.
येथे जाण्यासाठी रस्ते देखील उत्तम आहेत.
या डोंगरावर चढाई करताना एकमेकांना सोबत देत होणारा प्रवास आनंददायी आहे.
विशेष म्हणजे या ठिकाणी वन्यजीवांचा वावरही आहे. दिवसा हे वन्यप्राणी दिसत नसले तरी त्यांच्या खुणा त्यांची उपस्थिती दर्शवतात.
मित्रांसोबत थोडा निवांत वेळ घालवायचा असेल तर येथे जरुर भेट द्या.
एकूणच संगमनेरमधील निसर्गसंपन्न डोंगरांची ही रांग प्रसिद्ध पर्यटन स्थळ नसलं, तरी निसर्गाचा आनंद घेण्यासाठीचा निवांत ठिकाण आहे.