शीतल म्हात्रे प्रकरण, निकटवर्तीय जेलमध्ये, आदित्य ठाकरे अटकेतील पदाधिकाऱ्याच्या कुटुंबियांच्या भेटीला
"साईनाथ आमचा वाघ आहे. तो अन्यायाच्या विरुद्ध लढतोय. या राज्यात मोगलाई आल्यासारखी धरपकड चालू आहे. त्याच्याविरुद्ध आम्ही लढत राहू", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) प्रकरणात अटकेत असलेल्या युवासेना नेते साईनाथ दुर्गे (Sainath Durge) यांच्या घरी जावून त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलीय. साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. दुर्गे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. त्यानंतर आदित्य ठाकरे दुर्गे यांच्या दादर येथील घरी दाखल झाले. त्यांनी दुर्गे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीबद्दल आदित्य ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी त्या विषयावर फार काही बोलणं टाळलं. मी कुटुंबियांना फक्त भेटायला आलेलो, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी साईनाथ यांचं कौतुक केलं.
“साईनाथ आमचा वाघ आहे. तो अन्यायाच्या विरुद्ध लढतोय. या राज्यात मोगलाई आल्यासारखी धरपकड चालू आहे. तरुणांचे खोटे आरोपांवरुन आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न चालू आहे. त्याच्याविरुद्ध आम्ही लढत राहू. त्याविरोधात आम्ही लढत राहू. साई हा युवासेनेचा व शिवसेनेचा वाघ आहे तोही लढत राहील. अशा मोगलाईला कोणी घाबरत नाही. हा महाराष्ट्र आहे आणि आम्ही या अन्यायाविरुद्धल लढलो”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दुर्गे यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर दिली.
साईनाथ दुर्गे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या युवासेना नेते साईनाथ दुर्गेसह सहा आरोपींना आज बोरिवली न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी प्रदीर्घ सुनावणीनंतर साईनाथ दुर्गेसह सहाही आरोपींना बोरिवली कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप साईनाथ दुर्गे यांच्यावर करण्यात आला आहे. साईनाथ दुर्गे यांच्या वकील धनश्री लाड यांनी सांगितले की, पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र कोर्टाने फक्त दोन दिवसांची दिली आहे.
‘त्यांना हे प्रकरण 19 तारखेपर्यंत खेचायचे आहे’
ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. “दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज त्यांची सुटका होईल, असे आम्हाला वाटले होते. मात्र तसे काहीही झाले नाही. चौकशीच्या नावाखाली 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. याचा अर्थ त्यांना हे प्रकरण 19 तारखेपर्यंत खेचायचे आहे. तोपर्यंत एसआयटी स्थापन केली जाईल आणि ती एसआयटीकडे पाठवली जाईल. आम्ही अशी काही कृती योजना पाहत आहोत”, असं सजना घाडी यांनी सांगितलं.
‘राज प्रकाश सुर्वे यांनाही आरोपी बनवण्याची आमची मागणी’
“व्हिडिओ एडिट केला आहे का? यावर अद्याप निर्णय झाला नाही. पोलीसही मंत्रालयाच्या दबावाखाली काम करत आहेत. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा गैरवापर आहे. राज प्रकाश सुर्वे यांच्या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडिओ लाईव्ह करण्यात आला होता. नंतर राज प्रकाश सुर्वे यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अकाऊंटवरून डिलीट केला होता. पुरावे नष्ट केल्याप्रकरणी राज प्रकाश सुर्वे यांची चौकशी व्हायला नको का? राज प्रकाश सुर्वे यांनाही आरोपी बनवण्याची आमची मागणी आहे”, असं संजना घाडी म्हणाल्या.