Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंना राष्ट्रवादीचं कवच?, सेनाभवनात आले, पण मीडियाशी बोलले नाही
Aaditya Thackeray : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांशी चर्चा केली होती. आज शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक आहे. त्यासाठी आदित्य ठाकरे शिवसेना भवनात आले आहेत.
मुंबई: शिवसेनेचे (shivsena) जवळपास 50 आमदार फुटल्याने शिवसेना पुरती हादरून गेली आहे. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडामुळे पक्षाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी पक्षाची आणखी पडझड होऊ नये म्हणून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या जिल्हाप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांसह मुंबईतील नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. दिवसभर या बैठकांचा सपाटा सुरू राहणार आहे. या बैठकांना उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बैठकीसाठी शिवसेना भवनाकडे निघाले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला नाही. मात्र, त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण होत्या. त्यामुळे आदित्य यांना राष्ट्रवादीचं कवच असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांशी चर्चा केली होती. आज शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक आहे. त्यासाठी आदित्य ठाकरे शिवसेना भवनात आले आहेत. मातोश्रीवरून आदित्य ठाकरे शिवसेना भवनाकडे जायला निघाले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाणही होत्या. शिवसेनेला राष्ट्रवादीने पूर्ण पाठबळ असल्याचं स्पष्ट होत आहे. काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आम्ही शिवसेनेसोबत असल्यांच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक पावलावर शिवसेनेसोबत असल्याचं दिसत आहे. संकटाच्या काळात फक्त राष्ट्रवादीच शिवसेनेसोबत असल्याचं दिसून येत आहे.
राष्ट्रवादी शिवसेनेसोबत का?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राजकारणातील एकमेकांचे हाडवैरी. मात्र, व्यक्तिगत पातळीवर या दोन्ही नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कौटुंबिक संबंध होते. शरद पवार हे याच मैत्रीच्या धाग्यातून बाळासाहेबांना भेटायला अनेकदा मातोश्रीवर जायचे. सुप्रिया सुळे यांना पहिल्यांदा राज्यसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. ही बातमी कळल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांना फोन करून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याचं सांगितलं. राज्यसभेची जागा भाजपच्या खात्यात असतानाही बाळासाहेबांनी भाजपला उमेदवार देऊ दिला नाही. त्यावरून पवार आणि बाळासाहेबांची मैत्री किती गाढ होती हे यावरून दिसून येतं. त्याचमुळे आता मित्राचा मुलगा संकटात सापडल्यामुळे शरद पवार हे मैत्रीला जागत उद्धव ठाकरे यांना मदत करत असल्याचं सांगितलं जात आहे
जोर बैठका
शिवसेनेत अधिक पडझड होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सक्रिय झाले आहेत. काल त्यांनी शिवसेना संपर्क प्रमुखांशी संवाद साधला. आता जिल्हाप्रमुखांशी संवाद साधत आहेत. संध्याकाळी नगरसेवकांशी संवाद साधणार असून रात्री खासदारांशी चर्चा करणार आहेत. या बैठकांमधून प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील चाचपणी करतानाच आपल्यासोबत कोण कोण आहेत याचा आढावाही उद्धव ठाकरे घेणार आहेत.