जमीन घोटाळ्यांच्या आरोपांवर अब्दुल सत्तार यांचं प्रथमच स्पष्टीकरण, विधानसभेत काय म्हणाले?
या मुद्द्यावर कोर्ट जो निर्णय देईल, तो मान्य असल्याचं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं.
नागपूरः एक-दोन नाही तर तीन प्रकरणांत कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांना सत्तार काय उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यापैकी वाशिम (washim) येथील गायरान जमीन खासगी व्यक्तीच्या नावे करून देण्याचा महत्त्वाचा आरोप आहे. सत्तार यांनी आज विधानसभेत यावर स्पष्टीकरण दिलं. तर टीईटी घोटाळ्यातील गैरव्यवहाराचा वापर अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मुलींना नोकरी लावण्यासाठी करून घेतल्याचा आरोप आहे. या आरोपावरही फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्टीकरण दिलं.
गायरान जमीनीच्या आरोपांना सत्तार यांचं उत्तर-
वाशिम येथील जमिनीचं हे प्रकरण आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गायरान जमीन प्रकरणी निरीक्षण नोंदवलेलं आहे. त्याकडे दुर्लक्ष करत सत्तार यांनी दीडशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
योगेश खंडारे नामक व्यक्तीला वाशिम जिल्ह्यातील ३७ एकर जमीन नियमित करून दिल्याचा हा आरोप आहे. विधानसभेत बोलताना, शासन निर्णयानुसार, काही जमिनी भूमीहीन शेतकरी, अनुसूचित जाती जमाती या व्यक्तींना प्रदान करणे अनुज्ञेय आहे. शासनाच्या निर्णयानुसार अशा व्यक्तींची अतिक्रमणं नियमित करण्याचे निर्णय यापूर्वी अनेकवेळा घेण्यात आले आहेत.
त्यात शाळा, दवाखाने, सार्वजनिक बांधकामे यासाठी हे नियम शिथिल करण्यात येतात. या प्रकरणातील मागासवर्यीय, आदिवासी समाजाचे प्रमुख लोक होते, त्यांच्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मला जे आरोप केलेत, त्यानुसार हायकोर्टाने मला जी शिक्षा देईल, ती मान्य आहे.
या आदेशामुळे कोणताही फायदा किंवा नुकसान झालेलं नाही. महसूल मंत्री यांच्यासमोर पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावर कोर्ट जो निर्णय देईल, तो मान्य असल्याचं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं.
तर टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलीच लाभार्थी असल्याचा आरोप आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. सत्तार यांच्या मुली या पात्रता परीक्षेत अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या प्रक्रियेत त्यांना नोकरी लागलेली नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.