राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेत यावे, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ऑफरने राजकीय चर्चांना उधाण
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठी ऑफर दिली आहे.
अहमदनगर : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठी ऑफर दिली आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे अनुभवी नेतृत्व आहे. त्यांची राज्याला गरज असून त्यांनी शिवसेनेत यावं, असं आवाहन करत राजकीय ऑफर सत्तार यांनी दिली. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अब्दुल सत्तार आणि राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूरमध्ये एकाच मंचावर आले होते. त्यावेळी सत्तार यांनी हे वक्तव्य केलं (Abdul Sattar offer Radhakrishna Vikhe Patil to join Shivsena).
अब्दुल सत्तार म्हणाले, “राधाकृष्ण विखे पाटील अनुभवी नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्र राज्याला गरज आहे. विखे पाटलांनी शिवसेनेत यावं.” असं असलं तरी राधाकृष्ण विखे यांनी मात्र अब्दुल सत्तार आणि आपल्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, “अब्दुल सत्तार आणि माझी पक्ष विरहीत मैत्री आहे. अनेक वर्षापासुन ते माझे चांगले स्नेही आहेत. आमच्या या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही.”
दरम्यान, शिवसेना नेते तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीचं कारण अजून गुलदस्त्यात आहे. सत्तार यांनी विखेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने नगर जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. (Abdul Sattar Meet Radhakrushna Vikhe patil)
राज्यात शिवसेना भाजप जोरदार संघर्ष सुरु असताना तसंच पदवीधर निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असताना सत्तार यांनी विखेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. पडद्यामागच्या काही राजकीय गणितांवर विखे-सत्तार यांच्यात चर्चा झाली का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. श्रीरामपूर येथे पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे अब्दुल सत्तार यांच्या हस्ते भुमिपूजन पार पडलं. या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते.
राधाकृष्ण विखेंच्या लोणी येथील निवासस्थानी जाऊन सत्तार यांनी विखेंबरोबर स्नेहभोजन केलं. भोजनानंतर विखे-सत्तारांमध्ये गप्पांची मैफल रंगली. दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. भेटीनंतर एका लग्नाला दोघांनीही एकत्र हजेरी लावली. यावेळी त्यांच्यात बऱ्याचवेळ चर्चा झालेली पाहायला मिळाली. विखे-सत्तार दोघेही वर्षभरापूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्यात खास मैत्री होती. मात्र दरम्यानच्या काळात काही गणिते बदलली आणि सत्तारांनी सेनेचा भगवा हाती धरला तर विखेंनी भाजपचं कमळाचं उपरणं आपल्या गळ्यात बांधलं. दोघांच्या राजकीय वाटा जरी वेगळ्या झाल्या असल्या तरी आज सत्तारांनी विखेंची भेट घेऊन मैत्री शाबूत ठेवली आहे.
संबंधित बातम्या :
अब्दुल सत्तार विखे पाटलांच्या भेटीला, एकत्र स्नेहभोजनाचा आस्वाद, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात!
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अब्दुल सत्तार म्हणाले, खैरे साहेबांचा आदेश जबाबदारीने पूर्ण करु
बिहारचा एक्झिट पोल एक्झॅक्ट ठरला की समजा दिल्ली खतरे में है; अब्दुल सत्तारांची टोलेबाजी
व्हिडीओ पाहा :
Abdul Sattar offer Radhakrishna Vikhe Patil to join Shivsena