TET Scam : हा माझ्या बदनामीचा कट; …तर बिनधास्त कारवाई करा, टीईटी प्रकरणावर सत्तारांची प्रतिक्रिया
टीईटी घोटाळ्याप्रकरणात TET Scam परीक्षा परिषदेकडून जी यादी जारी करण्यात आली, त्या यादीमध्ये अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींच्या नावाचा देखील समावेश आहे. मात्र सत्तार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळ्यात (TET Scam) जे विद्यार्थी सहभागी होते त्यांची एक यादी परीक्षा परिषदेकडून जारी करण्यात आली आहे. या यादीत आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन्ही मुलींची नावे देखील आहेत. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख यांची नावे या यादित असल्याचे समोर आले आहे. याबाबत अब्दुल सत्तार यांना विचारले असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ही यादी 2019 मध्ये जी टीईटीची परीक्षा झाली आहे, त्या विद्यार्थ्यांची आहे. माझ्या मुलींनी 2020 मध्ये टीईटीची (TET) परीक्षा दिली होती. आणि त्या या परीक्षेत अपात्र ठरल्या होत्या मग या यादीत त्यांचे नाव कसे आले असा सवाल अब्दुल सत्तार यांनी उपस्थित केला आहे. तसेच यासंबंधात जर माझ्या संस्थेकडून शिक्षण विभागाला किंवा कोणाला एखादे साधे पत्र जरी गेले असेल तर आमच्यावर बिनधास्त कारवाई करा असेही अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना सत्तार यांनी म्हटलं आहे की, हा माझ्या बदनामीचा कट असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी प्रशासनातर्फे करत आहे.
नेमकं काय म्हटलंय अब्दुल सत्तार यांनी?
अब्दुल सत्तार यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. मी जी यादी पाहिली ती 2019 मधील आहे. माझ्या मुलींनी परीक्षा 2020 मध्ये दिली होती. त्यात त्या अपात्र ठरल्या होत्या. मग या यादीत नाव येण्याचा प्रश्नच नाही. गेल्या चार वर्षांमध्ये जर माझ्या संस्थेकडून या संदर्भात शिक्षण विभागाला एखादे पत्र जरी गेले असेल तर आमच्यावर बिनधास्त कारवाई करा असे सत्तार यांनी म्हटले आहे. हा माझ्या बदनामीचा कट आहे. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांची चौकशी करावी अशी मागणी देखील सत्तार यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
टीईटी घोटाळा प्रकरणात जे विद्यार्थी दोषी आढळून आले आहेत त्यांची एक यादी परीक्षा परिषदेकडून जारी करण्यात आली आहे. या यादीमध्ये तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांच्या नावाचा समावेश आहे. याच यादीत अब्दुल सत्तार यांच्या दोन कन्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख यांची नावे देखील असल्याचे समोर आले आहे. या यादीत ज्यांची नावे देण्यात आली आहेत. त्यांच्यावर कायम स्वरुपी टीईटीची परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा ईडीकडून देखील समांतर तपास सुरू आहे.