अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा आमरण उपोषणाचा इशारा, साखळाई पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता
अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील प्रलंबित साकळाई पाणी योजनेचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांनी ही योजना तातडीने मंजूर न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

अहमदनगर : अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील प्रलंबित साकळाई पाणी योजनेचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद यांनी ही योजना तातडीने मंजूर न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
साकळाई योजनेतून अहमदनगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे साकळाई योजनेतून 3 टीएमसी पाणी मिळावे यासाठी दिपाली सय्यद यांनी लढा उभारला आहे. ही योजना तातडीने मंजूर झाली नाही, तर आपण 9 ऑगस्ट रोजी (क्रांती दिन) आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिपाली सय्यद यांनी दिला. यासाठी त्यांनी साकळाई योजनेच्या लाभक्षेत्रातील गावामध्ये जाऊन ग्रामस्थांच्या भेटी घेत संवादही साधला. तसेच साकळाई योजना जनतेच्या रेट्यानेच पुढे जाणार असल्याचे स्पष्ट केले.
दिपाली सय्यद म्हणाल्या, “साकळाई योजनेतून अहमदनगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी साकळाई योजनेतून 3 टीएमसी पाणी मिळणे आवश्यक आहे. मात्र, मागील 20 वर्षांपासून येथील लोकप्रतिनिधी या योजनेच्या माध्यमातून फक्त राजकारणच करत आहेत. म्हणूनच तात्काळ या योजनेला मंजूरी न दिल्यास मी 9 ऑगस्टपासून आमरण उपोषण करणार आहे.”
दरम्यान, साकळाई योजनेसाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी देखील पाठपुरावा केला आहे. एवढेच नाही तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत या योजनेच्या मंजुरीसाठी बैठक देखील घेण्यात आली. तरी देखील या योजनेला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. अशातच दिपाली सय्यद यांनी या लढाईत उडी घेतल्याने या आंदोलनाला एक वेगळं वलय प्राप्त झालं आहे.