ज्यांना गुवाहाटीला जायला मिळाले नाही त्यांना दाओसला घेऊन जात आहे का? आदित्य ठाकरेंची टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाओस दौऱ्याला 50 लोकांचे भलेमोठे शिष्ठमंडळ घेऊन चालले आहेत. यावरुन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. इतका मोठा लवाजमा घेऊन जायला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने परवागनी दिली आहे का असा सवाल ठाकरे यांनी केला आहे.

मुंबई | 15 जानेवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाओस दौऱ्यावरुन युवा सेना प्रमुख, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. आज गोड बोलायचा दिवस आहे. पण सत्य देखील बोलायची गरज आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी दाओस दौऱ्याला 50 लोकांना घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. या दौऱ्याला गेल्यावेळी 28 तासांत 40 कोटी रुपये खर्च केले होते. आधी गुवाहाटीला जाताना 50 खोके होते. ज्यांना गुवाहाटीला जायला मिळाले नाही. त्यांनाही दाओस दौऱ्याला घेऊन जात आहेत वाटते अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने परवानगी दिली आहे का ?
परदेश दौऱ्याविषयी परराष्ट्र मंत्रालय आणि वित्त विभागाची परवानगी घ्यावी लागते असे सांगत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत . यावेळी बोलताना म्हणाले की ‘ मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यासाठी 10 लोकांना परवानगी दिली असल्याची माहिती आहे. त्यात आता इतर लोकांची परवानगी केंद्रीय मंत्रालयाने दिली आहे का ? या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत उदयोग मंत्री, खासदार, माजी खासदार सुद्धा आहेत. त्यामुळे ज्यांना गुवाहाटीत नेलं नाही , त्यांना आता दावोसला घेऊन जातायत असं वाटतंय, असाही टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
दाओस दौऱ्याला एमएसआरडीसीचे अधिकारी, ओएसडी चालले आहेत. उपमुख्यमंत्री यांचे सुद्धा ओएसडी आहेत. लोकांची यादी तुम्ही पाहिलं तर जनतेला धक्का बसेल. केंद्र सरकारचा या सगळ्यावर अंकुश आहे की नाही ? या दौऱ्यात काही दलालसुद्धा आहेत अशी माहीती आहे. जिथे पाच-सहा लोकांचं काम आहे तिथे एवढे लोक का घेऊन जाताय, एवढे लोक बॅग उचलायला का ? असाही सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच या 50 लोकांत कोणीही बिझनेसमेन नाही. त्यामुळे हा खर्च जरी स्वतः ते करणार असले तरी परराष्ट्र मंत्रालयाला हे माहिती आहे का ? इतक्या लोकांना परवानगी दिली आहे का ? त्यामुळे भाजपने रेसकोर्स खर्च आणि दाओस दौऱ्यावर त्यांची भूमिका स्पष्ट करावी असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
सर्वसामान्यांचा पैसा वाया जात आहे..
मुख्यमंत्री त्यांच्या तीन ते चार दलाल मित्रांना सुद्धा दावोसला सोबत नेत आहेत. दौऱ्यात ज्यांना परवानगी देण्यात आली आहे ते त्यांच्या सोबत बायकोला घेऊन जाऊ शकतात. मित्र येथे मुलांना सुद्धा घेऊन जातायेत. यात महाराष्ट्र सरकारचा, सर्व सामान्यांनाचा पैसे जातोय. त्यामुळे यांची स्थिती ‘वऱ्हाड निघालंय लंडनला, तसा हे वऱ्हाड निघाला दावोसला’ अशी गत झाली आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
घोड्यांच्या तबेल्यासाठी १०० कोटी रुपये खर्च ?
मुंबईतल्या ऐतिहासिक महालक्ष्मी रेसकोर्स बाबत देखील आदित्य ठाकरे यांनी सरकारला सवाल केला आहे. 3 ते 4 रेसकोर्सच्या क्लब मधील सदस्य हे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करताहेत. 226 एकर जागा विभागली जाणार आहे. काही एकर जागा ही रेसकोर्ससाठी आणि इतर 120 एकर जागा थीमपार्कसाठी राखीव ठेवली आहे आणि बाकी जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आणि घोड्यांच्या तबेल्यासाठी 100 कोटी रुपये का खर्च केले जातं आहेत? असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
