आदित्य ठाकरेंचं ठाण्यातल्या खड्ड्यांनी स्वागत, नंतर ट्राफिकचा वैताग
ठाण्यात उद्यान आणि गायमुख येथील चौपाटीच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray Thane) हजेरी लावली. त्याच्या गाड्यांच्या ताफ्याला खड्ड्यामुळे वाहतुकीचा देखील फटका बसला.
ठाणे : सामान्य जनता दररोज खड्डे चुकवत वाहनं चालवते आणि यामध्ये अनेकदा अपघातही होतात. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray Thane) यांनाही खड्ड्यांचा अनुभव घ्यावा लागला. अगोदर खड्ड्यांचा आणि नंतर वाहतूक कोंडीचा मनस्ताप त्यांना सहन करावा लागला. ठाण्यात उद्यान आणि गायमुख येथील चौपाटीच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray Thane) हजेरी लावली. त्याच्या गाड्यांच्या ताफ्याला खड्ड्यामुळे वाहतुकीचा देखील फटका बसला.
शहरात जोपर्यंत कामे सुरु आहेत, तोपर्यंत खड्डे पडणारच, अशी प्रतिक्रिया युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. आदित्य ठाकरे यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया देऊन ठाण्यातील सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाची बाजू घेतली. शहरात खड्डे पडले आहेत, हे जरी खरे असले तरी शहरात कामे सुरु आहेत. कामे सुरु असली तर अडचणी निर्माण होत असतात, कारण रस्त्यावर कामे सुरु आहेत. त्या ठिकाणावरुन मोठी वाहने जात असतात, त्याला तुम्ही काहीच करु शकत नाहीत, त्यामुळे जोपर्यंत कामे पूर्ण होत नाहीत, तो रस्ता ठिक होणार नाही. काम पूर्ण झाली की रस्तेही चांगले होतील असं ते म्हणाले.
टिकुजिनी वाडी येथील वनस्थळी उद्यानाच्या ठिकाणचे वसंत डावखरे यांच्या नावाचे फलक हटवून उद्यानाला वसंत डावखरेंचं नाव द्यावं, अशी मागणी भाजप गटनेते आणि स्थानिक नगरसेवकांनी मागणी केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव देण्याचं जाहीर करुन भाजपचीही नाराजी दूर केली.
ठाण्यात टिकुजिनी वाडी वनस्थळी उद्यानाचा लोकार्पण सोहळा, आगरी कोळी भवन भूमीपूजन, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी लोकार्पण आणि गायमुख घाट भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्ताने आदित्य ठाकरे ठाण्यात हजर होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना शहरातील खड्ड्यांवरही प्रश्न विचारले. पण त्यांनी महापालिकेची बाजू घेतली.
या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. सध्याच्या घडीला जनआर्शीवाद यात्रा महत्वाची नसून आमचे सर्व लक्ष हे कोल्हापूर आणि सांगली या भागांकडे असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. पूर ओसरला तरी साफसफाई आणि त्यांना मदत पोहोचवणं गरजेचं आहे, त्याला आम्ही अधिक महत्व देणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.