स्वत: साठी खोके आणि महाराष्ट्रासाठी धोके; महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आदित्य ठाकरेंची टीका
हे सरकार घटनाबाह्य आहे, हे खोके सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. जूनपर्यंत जो परकल्प राज्यात येणार होता, तो अचानक गुजरातला का गेला, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याची माहिती समोर येत आहे. यांनतर युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर ह्ललाबोल केला आहे. वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्टरच्या प्रकल्पाच्या विषयाची तीन वर्षांपूर्वी चर्चा झाली होती. वेदांत हा प्रकल्प मुंबईत येणार अशी घोषणा करण्यात आली होती असे आदित्य ठाकरे म्हणाले.
घोषणेनंतर काही झाले नव्हते. गेल्या वर्षी दावोसला वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई हे गेलेले असताना, आदित्य ठाकरे आणि देसाई यांनी वेदांतचे प्रमुख अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा केली होती.
हा उद्योग राज्यात आणणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले होते. त्यानंतर फॉसकॉनचे अध्यक्ष तैवानहून दिल्लीतून आले होते. सुभाष देसाई यांच्याशी त्यांची चर्चा झाली होती. त्यासाठी तळेगाव हे ठिकाणही ठरवण्यात आले होते. त्यानंतर कागदपत्र करण्याचे काम राहिले होते.
मात्र, नंतर सरकार बदलले. नंतर काही काळ काही झाले नव्हते. त्यानंतर अचानक हा प्रकल्प राज्यातून गुजरातला गेला, हे धक्कादायक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
अनिल अग्रवाल यांनी ट्विट करुन हा प्रकल्प गुजरातमध्ये नेणार असल्याचे सांगितले. हे प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाण्याचे दुख नाही. पण ही कंपनी 95 टक्के राज्यात येणार होती. पण अचानक ती गुजरातला का गेली असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
हा प्रकल्प सुमारे पावणे दोन लाख कोटींचा होता, असेहीत्यांनी सांगितले आहे. याच्याशी संबंधित 160 इंडस्ट्री राज्यात येणार होत्या. त्यातून 70 हजार रोजगार निर्मिती होणार होती, असेही त्यांनी सांगितले आहे.
गुजरात सरकारच्या उद्योगमंत्र्यांनी यासाठी प्रयत्न केले, त्यांचे अभिनंदन पण मग राज्यात जी यंत्रणा होती, तिने यात का काही केले नाही, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
हे सरकार घटनाबाह्य आहे, हे खोके सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. जूनपर्यंत जो प्रकल्प राज्यात येणार होता, तो अचानक गुजरातला का गेला, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. जुलैत सीएमओने ट्विट करुन हा प्रकल्प राज्यात येणार असे जाहीर केले होते. मग एका महिन्यात काय घडले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात सध्या सरकार आहे की नाही असा प्रश्न पडलेला आहे. कायदा सुव्यवस्था, गोळीबार यांचे प्रश्न आहेत. त्यामुळे राज्यात गुंतवणूक येत नसल्याचा आरोप आदित्य यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात साडे सहा लाख कोटींचे उद्योग आले होते. राज्यात दंगलग्रस्त स्थिती नव्हती. राज्यातील स्थितीवर गुंतवणूकदार आणि जनतेचा विश्वास होता. आता मात्र आता स्थिती बदललेली आहे. राज्यात येणारी कंपनी शेवटच्या क्षणाला का निघून गेली, सध्या राज्यातील यंत्रणेतील खऱ्या मुख्यमंत्र्यांनी हे सांगावं ही ही गुंतवणूक का बाहेर निघून गेली आहे असे आदित्य म्हणाले.