MVA: राऊतांच्या बाहेर पडण्याच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी, अजित पवार, भुजबळ, जयंत पाटील बैठकीला पोहोचले
आम्ही आजही उद्धव ठाकरेंसोबत आहोत. पण आमची कुणालाही जबरदस्ती नाही. आम्हाला लोकांनी विरोधात बसण्यासाठीच निवडून दिलंय. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत गेलो, असं वक्तव्य नाना पाटोलेंनी केलंय.

मुंबईः एकनाथ शिंदे गटातील आमदारांची इच्छा असेल तर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहोत, असं मोठं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये दाखल होत आहेत. शरद पवारांच्या (Sharad Pawar) नेतृत्वाखाली ही बैठक होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ, जयंत पाटील आदी महत्त्वाचे नेते या बैठकीला हजर आहेत. कालपर्यंत महाविकास आघाडी मोडणार नाही, या वक्तव्यावर ठाम असलेल्या शिवसेनेनं असं एकाएकी वक्तव्य केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज असल्याचं दिसून येत आहे. खुद्द छगन भुजबळ यांनी हे मान्यही केलं. बैठकीला जाण्यापूर्वी त्यांनी छगन भुजबळ यांनी पत्रकारांसमोर याबाबत प्रतिक्रिया दिली. आता राऊतांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील रणनिती ठरेल.
‘कल्पना द्यायला हवी होती’
राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले, शिवसेनेला काय निर्णय घ्यायचाय, तो घेण्यासाठी ते स्वतंत्र आहेत. पण हा निर्णय घेण्याआधी त्यांनी आम्हाला कल्पना द्यायला पाहिजे. शिवसेनेनं शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांना एकदाचं स्पष्ट सांगावं आणि यातील संभ्रम दूर करावा. शिवसेना आमचा सहयोगी पक्ष असून आताच त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही, असं असलं तरीही त्यांनी स्पष्ट भूमिका ठेवावी, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं.
संजय राऊतांचं वक्तव्य काय?
एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या आमदारांनी मुंबईत येऊन आपलं मत मांडावं. त्यांनी इथे येऊन सांगितलं तर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहोत. फक्त पुढच्या 24 तासांच्या आत आमदारांनी मुंबई यावं. हिंमत असेल तर इथे येऊन थेटपणे सांगावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलय.
नाना पटोलेंची प्रतिक्रिया काय?
दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आजही उद्धव ठाकरेंसोबत आहोत. पण आमची कुणालाही जबरदस्ती नाही. आम्हाला लोकांनी विरोधात बसण्यासाठीच निवडून दिलंय. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत गेलो. ताकाला जाऊन भांडं लपवायचं काम करत नाही. आम्हाला विरोधी पक्षात बसायची वेळ आली तर बसू. शिवसेनेला कुठं जायचं असेल तिथे त्यांनी जावं, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय.