आम्हाला मतदान का केलंस?, शिवसेना नगरसेवकांनी छिंदमला चोपलं
अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं […]
अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ पदरात पाडून घेतलं. त्यामुळे भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले. त्यांना 37 मते मिळाली. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांना 23 मते मिळाली. या निवडणुकीमुळे अहमदनगरमध्ये पुन्हा सोयऱ्या धायऱ्यांचं राजकारण पाहायला मिळत आहे. कारण सासरे शिवाजी कर्डिलेंना जावई राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांनी मदत केली.
श्रीपाद छिंदमला मारहाण
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारा अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम कुणाला मतदान करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भाजपतून हकालपट्टी झालेल्या श्रीपाद छिंदमने शिवसेनेला मतदान केलं. मात्र छिंदमने आपल्याला (शिवसेनेला) मतदान का केलं, या रागातून शिवसेना नगरसेवकांनी छिंदमला चोप दिला. तसंच भाजपनेच छिंदमला आपल्याला मतदान करण्यास बजावल्याचा आरोप शिवसेनेने केला. मात्र जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी हा आरोप फेटाळला.
अभद्र युती
एकंदरीत अहमदनगरमध्ये सासरे शिवाजी कर्डिले यांची भाजप आणि जावई संग्राम जगताप यांची राष्ट्रवादी अशी अभद्र युती पाहायला मिळाली. त्यामुळे नगरमध्ये पुन्हा सोयरे धायऱ्यांचं राजकारण सुरु झालं.
अहमदनगर महापालिका निवडणूक अंतिम निकाल 2018 :
- शिवसेना – 24
- राष्ट्रवादी -18
- भाजप -14
- काँग्रेस – 5
- बसपा – 04
- समाजवादी पक्ष – 01
- अपक्ष 2
- एकूण – 68
संबंधित बातम्या
अहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर