योग जुळला, तर पुन्हा एकत्र येऊ, सुजय विखेंचं सूचक वक्तव्य, नगरमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर?
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता स्थापन झाली होती. मात्र पुन्हा योग जुळून आला तर पुढील काळात एकत्र येऊ, असं सूचक वक्तव्य भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी केलं
अहमदनगर : अहमदनगरच्या महापौर आणि उपमहापौर पदाची मुदत (Ahmednagar Mayor Election) येत्या बुधवारी म्हणजे 30 जूनला संपत आहे. भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौर मालन ढोणे यांना निरोप देण्यात आला. गेल्यावेळी महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता स्थापन झाली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना, “पुन्हा योग जुळून आला, तर पुढील काळात एकत्र येऊ” असं सूचक वक्तव्य भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी केलं आहे. अहमदनगरमध्ये शिवसेनेचा महापौर आणि राष्ट्रवादीचा उपमहापौर असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मात्र विखेंच्या वक्तव्यामुळे नगरमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर होणार का? अशी चर्चा रंगली आहे. (Ahmednagar Mayor Election BJP MP Sujay Vikhe Patil hints at BJP NCP alliance)
काय म्हणाले सुजय विखे पाटील?
महापौर बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौर मालन ढोणे यांना निरोप देताना अडीच वर्षात केलेल्या कामांचं खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी प्रेझेंटेशन सादर केलं. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता स्थापन झाली होती. मात्र पुन्हा योग जुळून आला तर पुढील काळात एकत्र येऊ. अहमदनगर शहराच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊन आघाडी करायला तयार आहोत, असं स्पष्ट मत सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलं. त्यामुळे आता भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर होणार का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप तसेच भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते
शिवसेना उमेदवाराचा महापौरपदासाठी अर्ज
दरम्यान, शिवसेकडून महापौर पदासाठी रोहिणी शेंडगे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शेंडगे उमेदवारी अर्ज भरतील. शिवसेनेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप उपस्थित राहणार का, याकडे नगरवासियांचं लक्ष आहे. तर काँग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. भाजपकडे उमेदवार नसल्याने त्यांच्या भूमिकेकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अहमदनगर महापिकेत 68 नगरसेवक आहेत. त्यात श्रीपाद छिंदमचं पद रद्द झाल्याने सध्या 67 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 34 नगरसेवक लागणार आहेत.
अहमदनगर महापालिका पक्षीय बलाबल
शिवसेना- 23 राष्ट्रवादी-18 भाजप-15 काँग्रेस-5 बसपा-4 सपा-1 अपक्ष-2
एकूण – 68
संबंधित बातम्या :
अहमदनगर महापौरपदासाठी सेना-राष्ट्रवादीचा फॉर्म्युला ठरला, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
अहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर
अहमदनगरमध्ये राजकीय भूकंप, सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत
(Ahmednagar Mayor Election BJP MP Sujay Vikhe Patil hints at BJP NCP alliance)