अहमदनगरच्या महापौरपदासाठी शिवसेना उमेदवार निश्चित, राष्ट्रवादी उपमहापौरपदासाठी रिंगणात
शिवसेनेकडून रोहिणी शेंडगे या महापौर पदाच्या उमेदवार आहेत. बहुमतासाठी 34 नगरसेवक लागणार आहेत. येत्या 30 जूनला अहमदनगर महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे
अहमदनगर : अहमदनगरच्या महापौरपदासाठी (Ahmednagar Mayor) शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात एकमत झालं आहे. शिवसेनेकडे महापौरपद, तर राष्ट्रवादीकडे उपमहापौरपद देण्याचा निर्णय झाला आहे. शिवसेनेकडून रोहिणी शेंडगे या महापौर पदाच्या उमेदवार आहेत. येत्या 30 जूनला अहमदनगर महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. काँग्रेसची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात असून भाजपच्या भूमिकेकडेही लक्ष आहे. (Ahmednagar Mayor Election Shivsena Candidate Final NCP to bid for Vice Mayor)
शिवसेना-राष्ट्रवादी नेत्यांच्या भेटीगाठी
अहमदनगर महापालिकेवर सध्या राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपचा महापौर आहे. अहमदनगरचे महापौर पद अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असल्याने कोणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष लागले होते. गेल्या महिन्यात अहमदनगरमधील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापही उपस्थित होते. या बैठकीत महापौर पदासाठी शिवसेनेचा उमेदवार देण्यावर एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे.
अहमदनगर महापिकेत 68 नगरसेवक आहेत. त्यात श्रीपाद छिंदमचं पद रद्द झाल्याने सध्या 67 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 34 नगरसेवक लागणार आहेत.
अहमदनगर महापालिका पक्षीय बलाबल
शिवसेना- 23 राष्ट्रवादी-18 भाजप-15 काँग्रेस-5 बसपा-4 सपा-1 अपक्ष-2
2018 मध्ये अहमदनगर महापौरपदाच्या निवडणुकीत काय घडलं होतं?
अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत 2018 मध्ये भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले होते. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला होता. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ पदरात पाडून घेतलं. त्यामुळे भाजपचे बाबा वाकले महापौरपदी विजयी झाले. त्यांना 37 मते मिळाली. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांना 23 मते मिळाली होती. या निवडणुकीमुळे अहमदनगरमध्ये पुन्हा सोयऱ्या धायऱ्यांचं राजकारण पाहायला मिळालं होतं. कारण भाजपवासी सासरे शिवाजी कर्डिलेंना राष्ट्रवादीवासी जावई संग्राम जगताप यांनी मदत केली होती.
संबंधित बातम्या :
अहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर
अहमदनगरमध्ये राजकीय भूकंप, सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत
सांगली, जळगावप्रमाणे भाजपला अजून एक धक्का, अहमदनगर महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसणार?
(Ahmednagar Mayor Election Shivsena Candidate Final NCP to bid for Vice Mayor)