Ajit Pawar : महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींकडून अनावश्यक विधाने, अजितदादांची मोदींकडे जाहीर तक्रार; राज्यपालांवर निशाणा?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावरुन अजित पवार यांनी आज राज्यपालांवर टीका केली.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं (Pune Metro) उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी तिकीट काढून मेट्रो प्रवासही केला. त्यानंतर एमआयटी महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावरुन अजित पवार यांनी आज राज्यपालांवर टीका केली.
‘अलिकडे अनेक गोष्टी घडत आहेत. सन्मानीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्ये केली जात आहेत. ही वक्तव्ये महाराष्ट्राला मान्य होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थान केलं. ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाचा पाया रचला. या महामानवांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे न्यायाचा आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही आकस नाही, हे ही नम्रपणे नमूद करतो, अशा शब्दात अजित पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार यांनी एकप्रकारे राज्यपालांची पंतप्रधान मोदींकडे तक्रार केलीय.
अजित पवारांनी मानले पुणेकरांचे आभार
अजित पवार पुढे म्हणाले की, पुणेकरांच्या सहनशीलतेला खऱ्या अर्थाने दाद दिली पाहिजे. पुणे मेट्रो सुरु करण्यासाठी जवळपास 12 वर्षे लागली. नितीन गडकरी साहेबांनी वेळोवेळी कठोर भूमिका घेतली आणि त्यामुळे कुठेतरी मेट्रोला सुरुवात झाली. एक गोष्ट मान्य करावी लागेल की, पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना मेट्रो आणि अन्य विकासकामावेळी खूप त्रास सहन करावा लागला. अजूनही काही काळ हा त्रास सहन करावा लागणार आहे. ही विकासकामं अजून काही वर्षे सुरु राहणार असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
पंतप्रधान मोदींकडे महत्वाची मागणी
अजित पवार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींकडे महत्वाची मागणीही केली. अजित पवार म्हणाले की, मोदींना एक सांगायचंय. अंधेरी-घाटकोपर मार्गावर पहिली मेट्रो सुरुवात केली. तिचे 2006 ला भूमिपूजन झाले. ती 2019 ला सुरू झाली. मात्र, अजूनही पिंपरी-स्वारगेट जसं सुरू आहे, तसं स्वारगेट ते कात्रज आणि हडपसर ते खराडी मार्गाचे आहे. या दोन मार्गिकेच्या अहवाल प्रकल्पाचं काम सुरू आहे. ते काम पूर्ण करून जसं आताच्या मेट्रोमध्ये 50 टक्के राज्य आणि 50 टक्के केंद आणि 10 टक्के भागिदारी महापालिकेची आहे. त्याच धर्तीवर मेट्रो सुरू करण्यासाठी मदत आपण केली. तशीच मदत आम्हालाही करावी, असे आवाहन त्यांनी केले.
इतर बातम्या :