BREAKING | अखेर अजित पवार गटाने मौन सोडलं, फडणवीसांचं पत्र आणि नवाब मलिकांबाबत भूमिका उघड
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना सत्तेत सहभागी करुन घेण्यास विरोध दर्शवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपलं हे पत्र ट्विट देखील केलंय. त्यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं. या पत्रावर विरोधकांनी लगेच प्रतिक्रिया दिल्या. पण अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया येत नव्हती. अखेर अजित पवार गटाने या पत्रावरील मौन सोडलं आहे. अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांच्याबाबतच्या भूमिकेवर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
मुंबई | 7 डिसेंबर 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्यांनी तसं पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आली आहे. नवाब मलिक हे जेलमध्ये होते. त्यांना आजारपणावर उपचार करण्यासाठी जामीन मिळाला आहे. त्यानंतर ते आज हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आज नागपुरात विधान भवन परिसरात दाखल झाले. ते विधानसभेत अजित पवार गटाच्या आमदारांसोबत सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले. तसेच ते अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात बसले. त्यामुळे ते अजित पवार गटात गेल्याचं स्पष्ट झालं होतं. याशिवाय अजित पवार यांनीदेखील माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपण त्यांचं स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया दिली. पण देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे अजित पवार गट काय भूमिका मांडतो? याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. असं असताना आता अजित पवार गटाची भूमिका समोर आली आहे.
अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी नवाब मलिक यांच्याबाबतची भूमिका ट्विटरवर (X) मांडली आहे. त्यांनी ट्विट करत आपलं म्हणणं मांडलं आहे. विशेष म्हणजे त्यांचं हे ट्विट अजित पवार यांनीदेखील रिट्विट केलं आहे. तटकरेंनी सविस्तर लिहिलंय. पण नवाब मलिकांना आपल्या पक्षात सहभागी करुन घेतलं आहे का? याबाबत कोणताच स्पष्ट असा उल्लेख केलेला बघायला मिळत नाहीय.
सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले आहेत?
“आमदार नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे”, असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.
आमदार श्री. @nawabmalikncp हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी…
— Sunil Tatkare (@SunilTatkare) December 7, 2023
शरद पवार गटाची भूमिका काय?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील फडणवीसांच्या पत्रावर प्रतिक्रिया दिलीय. “नवाब मलिक हे फक्त राष्ट्रवादीचे नाही, तर महाराष्ट्राचे नेते आहेत. भाजपच्या विरोधात ते ताकदीने लढले आहेत. आमच्याकडून नवाब मलिकांचा सन्मान होईल. ते माझ्यासाठी आमच्या कुटुंबातील भाऊ आहेत. त्यांच्यावर अजून आरोप सिद्ध झालेले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं असेल तर ते दुर्दैवी आहे. महाराष्ट्राचं राजकारण खालच्या पातळीवर गेलं आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाले आहेत.
“नवाब मलिक जामिनावर आहेत. सुप्रिया सुळे सत्याच्या बाजूने असते. भुजबळ अडचणीत असताना जेलमध्ये गेले होते. जे कोणी जेलमध्ये गेले ते पोलिटकॉल विक्टिम म्हणून गेलेत. नवाब भाईंवर आरोप झालेत ते दूर्देवी आहेत. नवाब मलिकांनी पक्ष वाढीत काम केलं आहे. अजित पवार गट वेगळा झाला आहे तर ते असं वागवत असतील तर योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अध्यक्ष शरद पवार आहेत”, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे.