Ajit Pawar Meet Gadkari : अनिल देशमुखांच्या मुलासह अजित पवारांनी घेतली गडकरींची भेट! चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. महत्वाची बाब म्हणजे यावेळी अजित पवार यांच्यासोबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुखही उपस्थित होते.
नागपूर : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप नेत्यांमध्ये रोज नवे आरोप-प्रत्यारोप आणि टीका सुरु आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. महत्वाची बाब म्हणजे यावेळी अजित पवार यांच्यासोबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा मुलगा सलील देशमुखही उपस्थित होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. या बैठकीनंतर बोलताना राज्यातील रस्त्यांसाठी केंद्रीय फंडातून निधी मिळावा, अशी मागणी आपण नितीन गडकरी यांच्याकडे केल्याची माहिती अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.
‘रस्ते कामाच्या निधीबाबत चर्चा’
अजित पवार यांनी भेटीनंतर माधम्यांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले की, गडकरी साहेबांचा निरोप आला. केंद्राचा रोड फंड हा दरवर्षी केंद्र सरकार देशाला देत असतो. गेल्यावर्षी आपल्या महाराष्ट्राला 1200 कोटी रुपये मिळाला होता. त्यावर गडकरी साहेब म्हणाले 600 कोटी रुपयांची काे महाविकास आघाडी सरकारने सुचवावीत आणि 600 कोटीची भाजपच्या आमदारांनी सुचवावे. शेवटी महाराष्ट्रात बाराशे कोटी रुपये केंद्राचा निधी आला म्हणून मुख्यमंत्री, मी आणि सगळ्यांनी निर्णय घेतला. यातून भाजप आमदारांच्या क्षेत्रातील काम आणि महाविकास आघाडीच्या आमदारांच्या क्षेत्रातील काम करायची आहेत, म्हणून ते पैसे आपण खर्च केले असं अजित पवार म्हणाले.
विकासकामात राजकारण नको म्हणून चर्चा
आता नवीन वर्ष सुरु झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारचा काही निधी आपण देऊ शकाल का असं त्यांना विचारलं असता. तो निधी त्यांना डायरेक्ट देता येत नाही, केंद्राने राज्याला द्यावा लागतो आणि राज्य त्याचं वाटप करतं. त्यामुळे समन्वय असावा, विकास कामात कुठे राजकारण येऊ नये म्हणून आम्ही त्यांच्या घरी जाऊन चर्चा केल्याचंही अजित पवार म्हणाले.
अजित पवारांचा ‘वन नेशन, वन टॅक्स’चा सल्ला
गॅसवरचा कर आम्ही तीन टक्के कमी केला आहे. सरकारच्या तिजोरीमध्ये येणाऱ्या टॅक्समधून गॅसचा दर महाराष्ट्रातील लोकांना परवडावा म्हणून आम्ही केला आहे. याविषयी मी काल सांगितलं आहे की, वन नेशन वन टॅक्स केंद्राने लावला. त्या धर्तीवर विचार करावा आणि जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या राज्यांच्या प्रमुखांना विश्वासात घेऊन केंद्राचा टॅक्स किती आणि राज्याचा किती, या पद्धतीने विचार केला जाऊ शकतो, असं आपण सांगितल्याचं अजित पवार म्हणाले.