मलिक यांच्यासंदर्भात फडणवीस यांचे लेटरबॉम्ब, अजित पवार बॅकफूटवर, पत्राचे काय….
devendra fadnavis letter on nawab malik | भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना नवाब मलिक यांच्यासंदर्भात पत्र लिहिले. या पत्रानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाल्या. या पत्रावर विरोधकांच्याही प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यानंतर अजित पवार यांनी मौन सोडले आहे.
नागपूर, 8 डिसेंबर 2023 | भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यासंदर्भात गुरुवारी लेटरबॉम्ब टाकला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पत्र लिहिले. त्या पत्रात मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्यानंतर गुरुवारी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली होती. आता स्वत: अजित पवार यांनी यासंदर्भात मौन सोडले आहे. नवाब मलिक यांच्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पत्रावर आपण आपली भूमिका नवाब मलिक यांनी मत व्यक्त केल्यानंतर मांडणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. यावेळी या विषयावर अधिक बोलणे त्यांनी टाळले.
काय म्हणाले अजित पवार
देवेंद्र फडणवीस यांचे पत्र आपणास मिळाले आहे. आपण हे पत्र वाचले आहे. नवाब मलिक हे पहिल्यांदाच सभागृहात आले. त्यांची भूमिका काय आहे, हे ऐकल्यानंतर मी माझे मत देईल. फडणवीस यांच्या पत्रासंदर्भातील विषय नवाब मलिक यांनी त्यांचे मत व्यक्त केल्यानंतर आपण मांडणार आहोत. मलिक यांच्या भूमिकेनंतर मी माझी आणि पक्षाची भूमिका जाहीर करेल. आधी मलिक यांचे मत काय आहे, ते स्पष्ट कळू द्या, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
नवाब मलिक कुठे बसावे…
सभागृहात कोणी कुठे बसावे, हा माझा अधिकारी नाही. तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे, असे अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडवणीस यांना पाठिंबा दिला आहे? त्यावर पुन्हा अजित पवार यांनी त्या पत्राबद्दल मला जे करायचे ते मी करेल, हेच उत्तर दिले. यावेळी माध्यमांनी सारखा तो विषय लावून धरल्यावर अजित पवार चिडले. तुम्हाला अधिकार दिला म्हणजे तुम्ही कसेही वागणार का? असा प्रश्न त्यांनी केला.
काय आहे प्रकरण
नवाब मलिक हे कारागृहामध्ये होते. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे. ते आजारपणावर उपचार करण्यासाठी सध्या जामिनावर बाहेर आले आहेत. त्यानंतर ते हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने गुरुवारी नागपुरात विधान भवनात आले. विधानसभेत अजित पवार गटाच्या आमदारांसोबत जाऊन बसले. त्यानंतर अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात बसले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांचा महायुतीत न घेण्यासंदर्भात पत्र लिहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना त्यांनी हे पत्र लिहिले. त्यावर जोरदार राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.