बैठकीला कमी आमदार आल्याने अजित पवार अस्वस्थ?, एमईटीत गुप्त बैठक; काय घडतंय पडद्यामागं?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करून उपमुख्यमंत्रीपद मिळवलं आहे. मात्र, आता हेच बंड त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता दिसत आहे. अजित पवार यांच्या गटाने आमदारांचा मेळावा आयोजित केला आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करून उपमुख्यमंत्रीपद मिळवलं आहे. मात्र, आता हेच बंड त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता दिसत आहे. अजित पवार यांच्या गटाने आमदारांचा मेळावा आयोजित केला आहे. मात्र, या मेळाव्याला कमी आमदार आल्याने अजित पवार अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी एमईटीतच गुप्त बैठक घेतली असून आमदारांना संपर्क करणं सुरू झालं आहे. या आमदारांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश दिले जात असून जे येणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही दिला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांचं आज शक्तीप्रदर्शन होत आहे. वांद्रे येथील एमईटी कॉलेजच्या मैदानावर राष्ट्रवादीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते आले आहेत. अजित पवार हे सुद्धा या मेळाव्यात पोहोचले. पण मेळाव्याला अवघे 29 आमदारच पोहोचल्याने अजित पवार यांच्या गटाची धाकधूक वाढली आहे. अजित पवार यांच्याकडे 40हून अधिक आमदार असल्याचं सांगितलं जात होतं. या आमदारांनी प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे प्रतिज्ञापत्र सादर केलं असल्याचंही सांगितलं जात होतं.
अन् फोनाफोनी सुरू झाली
मात्र, प्रत्यक्षात फक्त 22 आमदारच या बैठकीला हजर झाल्याने अजित पवार यांचा चेहरा पडला होता. अजित पवार यांनी एमआयटीतच एक गुप्त बैठक घेतली. पदाधिकारी आणि आमदारांना तात्काळ कामाला लावले. जे आमदार आले नाहीत त्यांना फोन करा असे आदेश दिले. त्यानंतर फोनाफोनी सुरू झाली. स्वत: अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलही आमदारांना फोन करत होते. त्यानंतर वाटेत असलेल्या आमदारांनी कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. बैठक सुरू होईपर्यंत आमदारांची संख्या 29वर गेली होती.
बंड फेल ठरणार?
राष्ट्रवादीकडे एकूण 54 आमदार आहेत. त्यातील दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा असेल तरच अजित पवार यांचं बंड यशस्वी होऊ शकतं. तेवढं संख्याबळ नसेल तर त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होतो आणि त्यांचं मंत्रीपद जाऊ शकतं. त्यामुळे अजित पवार यांना आकडा टिकवावा लागणार आहे. आजच्या बैठकीत तो अपेक्षित आकडा नसल्याने अजित पवार यांची गोची झाल्याचं चित्र आहे.
शरद पवार यांच्याकडे 10 आमदार
दरम्यान, शरद पवार यांच्या गटाची बैठक अजून सुरू झालेली नाही. त्यांच्या बैठकीला आतापर्यंत 10 आमदार पोहोचले आहेत. त्यामुळे पवार गटातही चिंता व्यक्त केली जात आहे.