मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधातला ‘मॅटर’ भाजपनेच काढला, अजित पवारांचा गौप्यस्फोट, ‘भूखंड-श्रीखंड’ प्लॅनिंग नेमकं कुणाचं?
एकनाथ शिंदेंविरोधातला 'मॅटर' पहिल्यांदा भाजपनेच उघड केला, असा दावा अजित पवार यांनी केला.
नागपूरः नागपूर येथील ज्या भूखंडाबाबत गैरव्यवहार झाल्याचा ठपका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) ठेवण्यात आलाय, त्याची पीआयएल सर्वात आधी भाजपच्याच लोकांनी दाखल केली होती, असा मोठा गौप्यस्फोट अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलाय. नागपूरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती उघड केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर अधिवेशन कालावधीत निलंबनाची कारवाई झाल्यामुळे विरोधक प्रचंड संतापले आहेत.
सत्ताधाऱ्यांची सहा महिन्यांपासून मुजोरी सुरु आहे, असा आरोप अजित पवार यांनी आज केला. सत्ताधाऱ्यांच्या तक्रारी उचलून धरल्या जातात तर विरोधकांच्या दाबल्या जातात, असाही आरोप केला. यावेळी अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंविरोधातला ‘मॅटर’ कुणी उघड केला, हे सांगितलं.. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये येत्या काळात मोठी ठिणगी पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जातेय.
काय म्हणाले अजित पवार?
83 कोटी रुपये किंमत असलेला भूखंड 2 कोटीला दिला गेला. याबद्दल सगळं वातावरण तापलं आहे. भूखंडाचा श्रीखंड वगैरे आरोप केले जातायत… तो मॅटर पहिल्यांदा उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात आत्ता एकनाथ शिंदेंसोबत ज्या भाजपने सरकार स्थापन केलंय.. त्यांच्यातल्याच काही लोकांनी ती पीआयएल दाखल केली होती… असं वक्तव्य अजित पवार यांनी आज केलं.
संजय राऊतांनीही तेच सांगितलं…
संजय राऊत यांनीही काल झालेल्या पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, दीड महिन्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आणि नागोराव गाणार या विदर्भातल्या आमदारांनीच या विषयावर तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तोच विषय़ आम्ही घेतला.
याचा अर्थ स्पष्ट आहे. एकनाथ शिंदे यांच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड व्हावं, ही भारतीय जनता पक्षातल्याच लोकांची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस यांना मानणाऱ्या आमदारांची इच्छा आहे. या प्रकरणामागे भाजपच्याच प्रमुख नेत्यांचा हात आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रश्न विचारलाय, 16 भूखंडांसंदर्भात चौकशी व्हावी ही मागणी केली होती, असा दावा संजय राऊत यांनी केला.
बावनकुळेंचं ते वक्तव्य..
संजय राऊत यांनी कालच्या पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचीही आठवण करून दिली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात बावनकुळे फडणवीसांना उद्देशून म्हणाले, मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री व्हा… खोके सरकारने याचा अर्थ समजून घेतला पाहिजे, असे सूचक वक्तव्यही राऊत यांनी केलं होतं.
एकनाथ शिंदेंवरचे आरोप काय?
महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना नागपूर सुधार प्रन्यास अर्थात NIT भूखंड वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2021 मध्ये तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 व्यक्तींच्या हितार्थ हा निर्णय दिला. त्यामुळे उमरेड परिसरातील 2 लाख चौरस फूट जमीन, जिची किंमत 83 कोटी होती, ती 2 कोटी रुपयात दिली गेल्याचा आरोप आहे.