पन्हाळ्यावरील रोमँटिक गाण्यावरुन ट्रोल, खासदार अमोल कोल्हेंचं उत्तर
पन्हाळा गडावर शूट केलेल्या गाण्याचा महाराष्ट्र सरकारने गडकिल्ल्यांबाबत घेतलेल्या निर्णयाशी संबंध नाही, असं उत्तर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिलं आहे.
भंडारा : पन्हाळा गडावर रोमँटिक गाण्याचं शूटिंग (Romantic Song on Panhala) केल्यामुळे टीका करणाऱ्या ट्रोलर्सना राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe answers troll) यांनी उत्तर दिलं आहे. चित्रपटाच्या विषयाचा गडकिल्ल्याच्या निर्णयाशी संबंध नाही, विषय समजून घेऊन मत व्यक्त करा, असं आवाहन अमोल कोल्हे (Amol Kolhe answers troll) यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त ते भंडाऱ्यात (Bhandara) बोलत होते.
‘सोशल मीडियावरील कमेंट्स या एखाद्या राजकीय पक्षाची संस्कृती किती ढासळली आहे, याचं द्योतक आहेत. ‘मराठी टायगर्स’ (Marathi Tigers) या चित्रपटात मी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत होतो, तर अभिनेत्री बेळगाव सीमाभागाची प्रतिनिधी होती. महाराष्ट्र बेळगाव सीमाभागावर आधारित हा सिनेमा होता, याविषयी कमेंट करण्याआधी चित्रपट बघावा. विषय समजून घ्यावा, उगाच उथळपणे कमेंट करु नयेत.’ असं आवाहन डॉ. कोल्हे यांनी केलं.
‘मराठी टायगर्स’ चित्रपटातील ‘हुरहुर लागे श्वासांना’ हे गाणं पन्हाळा गडावर शूट झाल्यामुळे ‘गड किल्ल्यांविषयी पुळका आहे, मग चार वर्षांपूर्वी गड किल्ल्यांवर या रोमँटिक गाण्याचं चित्रीकरण कसं केलंत?’ हा प्रश्न अमोल कोल्हे यांना विचारला जात आहे.
‘गड किल्ल्यांबाबत घेतलेल्या निर्णयाचा या गाण्याशी संबंध नाही. हा बादरायण संबंध जोडण्याचा प्रयत्न होत आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी स्वतः मला हा निर्णय दाखवा असं आवाहन करत राजीनाम्याची मागणी केली होती, मी निर्णय दाखवला होता. आता ते काय करतात याची प्रतीक्षा आहे.’ असं उत्तरही अमोल कोल्हेंनी दिलं.
पन्हाळ्यावर रोमँटिक गाणं का चित्रित केलंत? खासदार अमोल कोल्हे सोशल मीडियावर ट्रोल
‘गडकिल्ल्यांविषयीच्या निर्णयाबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे, तो मागे घेण्यात आलेला नाही. जोपर्यंत सरकार हा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत ही लढाई संपणार नाही. जर हा निर्णय मागे घेतला नाही, तर महाराष्ट्रातला शिवप्रेमी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.’ असा इशाराही अमोल कोल्हेंनी दिला.
‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमोल कोल्हे, आशिष विद्यार्थी, विक्रम गोखले, दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे, तेजा देवकर, किरण शरद असे कलाकार होते. अवधूत कदम दिग्दर्शित या चित्रपटात बेळगाव सीमावादाचा प्रश्न हाताळण्यात आला होता.
गडकिल्ल्याबाबत निर्णय काय?
पर्यटनासाठी गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावरुन (Forts of Maharashtra) झालेल्या टीकेनंतर, पर्यटन मंत्रालयाकडून याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असं पर्यटन विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केलं होतं.
“राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग 1 आणि दुसरे वर्ग 2. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य सुमारे 300 किल्ले हे वर्ग 2 मध्ये येतात.
संबंधित बातम्या