अनिल देशमुख कोठडीतून बाहेर येणार? समोर आली महत्त्वाची अपडेट
हायकोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतरही देशमुखांचा कोठडीतला मुक्काम सपलं नव्हता! त्यानंतर आता महत्त्वाची अपडेट समोर आलीय.
कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा कोठडीतला मुक्काम लवकरच संपणार का? याकडे सगळ्यांची नजर लागलीय. कारण ईडीने (ED arrest) अनिल देशमुखांना दिलासा दिल्यानंतर आता त्यांनी सीबीआयच्या विशेष कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केलाय. नुकताच हायकोर्टाने अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी अनिल देशमुखांना हायकोर्टाने (High Court) दिलासा दिला होता.
2 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली होती. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र जामीन मिळूनही कोठडीतून देशमुखांची सुटका होऊ शकली नव्हती.
ईडीने दाखलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर अनिल देशमुखांनी सीबीआयच्या विशेष कोर्टात धाव घेतलीय. सीबीआयच्या विशेष कोर्टात जामीनासाठी त्यांनी अर्ज केलाय. मात्र या अर्जावर सुनावणी कधी होणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
लवकरच सीबीआयच्या विशेष कोर्टामध्ये अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल. या सुनावणीवेळी ईडीच्या जामीनाचा आधार घेत सीबीआय कोर्टात अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर सीबीआयचं विशेष कोर्ट अनिल देशमुखांना दिलासा देतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठणार आहे.
गेल्या 11 पेक्षा अधिक महिन्यांपासून अनिल देशमुख हे कोठडीत आहेत. याआधीही त्यांनी अनेकदा जामीनासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. अखेर मंगळवारी अनिल देशमुख यांच्या जामीनावर सुनावणी पार पडली होती. हायकोर्टात झालेल्या या सुनावणीदरम्यान देशमुखांना जामीन मंजुर करण्यात आला होता.
100 कोटी रुपयांच्या वसुलीचा सनसनाटी आरोप अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयने देशमुखांवर गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्याचा दाखला देत ईडीने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणाचा ठपका अनिल देशमुख यांच्यावर ठेवला होता.
ईडीच्या गुन्ह्यात जरी देशमुखांना जामीन मिळाला असला, तरी सीबीआयचा गुन्हा दाखल असल्यानं देशमुखांची कोठडीतून सुटका होऊ शकली नव्हती. दरम्यान, आता सीबीआयच्या गुन्ह्यातही दिलासा मिळवण्यासाठी देशमुखांडून पुन्हा प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळीआधी अनिल देशमुख कोठडीतून बाहेर येतात का, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय. सीबीआय कोर्ट याबाबत काय निर्णय घेतं, याकडेही सगळ्यांचं आता लक्ष लागलंय.