“…तर तेव्हाच ठाकरेंचं सरकार पडलं असतं”, अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट
आता अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी तीन वर्षांपूर्वीच ठाकरेंचं सरकार कोसळलं असतं, असा मोठा गौप्यस्फोट केला.
Anil Deshmukh Press Conference : सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला प्रस्ताव दिला होता. एका व्यक्तीच्या माध्यमातून फडणवीस यांनी आपल्याकडे निरोप पाठवला होता, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याप्रकरणी आता अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी तीन वर्षांपूर्वीच ठाकरेंचं सरकार कोसळलं असतं, असा मोठा गौप्यस्फोट केला.
“तीन वर्षांपूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे मिरजचे समित कदम यांना पाच-सहा वेळा पाठवले. एकदा तो माझ्याकडे सील केलेले पाकिट घेऊन आला. त्याने मला सांगितलं की याचं तुम्ही प्रतिज्ञापत्र करुन द्या. त्यात लिहिलं होतं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांसह अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे. त्या खोट्या आरोपाचे मी प्रतिज्ञापत्र करुन द्यायचं. माझ्याकडे ते पाकिट आणून देणारा तो माणूस म्हणजे समित कदम. तो मिरजचा आहे. समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यांनी अनेकदा देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत”, असे अनिल देशमुख म्हणाले.
“समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे अगदी घरगुती संबंध आहेत. समित कदम यांची पत्नी देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधतानाही फोटो पाहायला मिळत आहे. समित कदम हा अतिशय साधा कार्यकर्ता आहे. तो नगरसेवकही नाही. देवेंद्र फडणवीसांनी समित कदमला Y स्वरुपाची सुरक्षा दिली आहे. जर तुम्ही मिरज, सांगली या भागात चौकशी केली तर कोणीही तुम्हाला सांगेल की देवेंद्र फडणवीस आणि समित कदम यांचे काय संबंध आहेत”, असेही अनिल देशमुखांनी सांगितले.
“जेलमध्ये जा, नाहीतर भाजपमध्ये या”
“उद्धव ठाकरेंना तुरुंगात टाकणं मी समजू शकतो की ते राजकीय विरोधक आहेत. पण त्यांच्या मुलांना आदित्य यांनाही कशाप्रकारे खोट्या आरोपाखाली अडकवता येईल, यापद्धतीचा प्रयत्न तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला. मी जर तीन वर्षांपूर्वी त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर प्रतिज्ञापत्र दिलं असतं, तर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, अजित पवार हे सर्व अतिशय अडचणीत असते. लहान मुलांनाही या घाणेरड्या राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला. जेलमध्ये जा, नाहीतर भाजपमध्ये या”, असेच यांचे धोरण आहे.
“तर तेव्हाच ठाकरेंचं सरकार पडलं असतं”
“याचा पहिला प्रयोग माझ्यावर झाला. तो अयशस्वी झाला. त्यानंतर दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेंवर झाला आणि तो यशस्वी झाला. त्यानंतर तिसरा प्रयोग अजित पवारांवर झाला आणि तोही यशस्वी झाला. माझ्यावर केलेला प्रयोग जर यशस्वी झाला असता तर तेव्हाच ठाकरेंचं सरकार पडलं असतं”, असा गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केला.