अनिल देशमुख भाजप सरकारमध्ये येणार होते, पण…अजित पवार यांचा मोठा दावा काय?
5 जुलै रोजी काय घडलं ते मी सांगितलं. मी कुणाचीही बदनामी करणारा नाही. कुणालाही कमी लेखणारा नाही. कुणाचीही समाजात प्रतारणा करणारा नाही. राष्ट्रवादीच्या सदस्यांना त्यावेळी नेमकं काय घडलं हे माहीत पाहिजे. त्यामुळे माहिती दिली. आम्ही मंत्रिमंडळात गेल्यावरही आमच्या नेत्याने आम्हाला भेटायला बोलावलं होतं. त्यावर काँग्रेसनेही टीका केली होती, याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष वेधलं.
योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कर्जत | 1 डिसेंबर 2023 : शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अनिल देशमुख यांनाही शिंदे -भाजप सरकारमध्ये यायचं होतं. पण मंत्रिपद न मिळाल्यानेच ते आमच्यासोबत आले नाहीत, असा मोठा दावा अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांची पोलखोल केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचं अधिवेशन कर्जत येथे सुरू आहे. या अधिवेशनात अजित पवार यांनी भाषण केलं. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांची पोलखोल केली. भाजपसोबत जाण्याच्या आमच्या चर्चा होत होत्या. तेव्हा होत असलेल्या प्रत्येक मिटिंगला अनिल देशमुख आमच्यासोबत होते. त्यावेळी, मला मंत्रिमंडळात स्थान मिळालं पाहिजे, असा आग्रह अनिल देशमुख यांनी धरला होता. पण देशमुख यांना मंत्रीपद देण्यास भाजपने नकार दिला.आम्ही सभागृहात देशमुखांवर आरोप केले आहेत. त्यांना लगेच मंत्रिमंडळात घेतलं तर आमच्या विश्वासहार्यतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होईल. त्यामुळे त्यांना घेता येणार नाही. असं भाजपने सांगितलं. अनिल देशमुख यांचं नाव कमी झालं. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळत नसल्याने मी तुमच्यासोबत येत नाही असं देशमुख म्हणाले. हे स्पष्ट आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असं अजित पवार म्हणाले.
ते सातही आमदार आमच्यासोबत
यावेळी अजितदादांनी देशभरातील राष्ट्रवादीचे नेते आपल्या संपर्कात असल्याचं सांगितलं. नागालँडचे सातही आमदार आमच्यासोबत आहेत. काल आमची कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला ईशान्य भारत, बिहार, यूपी आणि दिल्लीतून लोक आले होते. रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. पदाधिकाऱ्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे याची माहिती यावेळी देण्यात आली, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
ते शब्द वापरू नये
यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी काही कानपिचक्याही दिल्या. सकल मराठा समाज, ओबीसी, धनगर आणि आदिवासींचे आंदोलन सुरू आहे. नेत्यांना काळे झेंडे दाखवले जात आहेत. प्रत्येकाला आपलं मत मांडता येतं. मतमतांतर असू शकतं. पण कुणाला तरी कमी लेखायचं हे योग्य नाही. जी महाराष्ट्राची संस्कृती नाही अशा प्रकारचे शब्द वापरू नये. सत्ताधारी, विरोधक आणि राजकीय पक्षांशी संबंध नाही त्यांनीही हे करू नये. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यावर आमचा भर आहे. कुणी वंचित राहिलं असेल तर त्याला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे, असंही ते म्हणाले.
जनगणना करा
जनगणना जातनिहाय करावी अशी आमची मागणी आहे. कोण मागास आहे. किती जाती वाढल्या. याची माहिती समोर आली पाहिजे. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.