नोटांवर बाळासाहेबांचा ठाकरेंचा फोटो असावा, ठाकरे गटातील नेत्याची मागणी, कारणही सांगितलं…
नोटांवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी चलनातील नोटेवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो लावण्याचं विधान केलं आणि त्यावर आता विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. विविध पक्षातील नेते आता वेगवेगळी मागणी करू लागले आहेत. सगळेच नेते आपआपल्या पक्षाच्या नेत्यांच्या फोटोची मागणी करायला लागले तर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ही आमची अस्मिता आहे. त्यामुळे भारतीय चलनातील नोटेवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात यावा, असं ठाकरेगटाचे नेते अनिल परब (Anil parab) यांनी उपरोधाने म्हटलं आहे.
नितेश राणे यांची मागणी
भाजप नेते नितेश राणे यांनी चलनातील नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असावा, अशी मागणी केली आहे.
तर रिपाइं खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी गौतम बुद्ध यांचा फोटो नोटेवर लावण्याची मागणी केली आहे. बुद्ध ही भारताची ओळख आहे. त्यामुळे भारतीय चलनावर बुद्धांचा फोटो असावा अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना नोटेवरील फोटोबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी खोक्यांचाही संदर्भ दिलाय. नोटांवर कुणाचा फोटो यापेक्षा या नोटा लोकांच्या हातात पोहचणं जास्त महत्वाचं आहे. 50 खोके गद्दारांच्या घरी पोहचले. ते पैसे लोकांच्या मदतीला आलेले नाहीत, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.