शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरीच! एकनाथ शिंदे गटाला मोठा झटका!
विधानसभेतील शिवसेना विधीमंडळ पक्षनेतेपदी अजय चौधरींची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईः शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मोठा झटका देणारी बातमी आहे. शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी अजय चौधरींचीच नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंना ज्या गटनेतेपदावरून हटवण्यात आलं होतं, त्या पदावर शिवसेनेनं अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांची नियुक्ती केली होती. शिंदे गटानं या नियुक्तीला आव्हान दिलं होतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे गटातील या वादात उद्धव ठाकरेंचा विजय झाला आहे. उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या कार्यलयाकडून जारी केलेल्या एका पत्राद्वारे अजय चौधरींच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बंडखोर गटाला हा मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे.
16 बंडखोर आमदारांवर टांगती तलवार?
शिवसेनेच्या गटनेतेपदी अर्थात विधीमंडळाच्या पक्ष नेतेपदी अजय चौधरी यांना मान्यता मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाला धोका निर्माण झाला आहे. शिंदे गटातील 16 आमदारांचं निलंबन करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. त्यानुसार आज सुनावणी होणार आहे. शिवसेनेचे सुनिल प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित न राहिलेल्या या आमदारांच्या निलंबनावर आता सुनावणी सुरु होईल. आता गटनेते पदी उद्धव ठाकरे गटातील अजय चौधरी यांची नियुक्ती झाल्यामुळे बंडखोर 16 आमदारांच्या सदस्यत्वावर टांगती तलवार आहे.
रडारवरील आमदारांचं पुढे काय?
शिवसेनेकडून अपात्र ठरवलेल्या आमदारांबाबत विधानसभा उपाध्यक्षांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर सदर आमदारांना शिवसेनेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर एका वेळी 4 आमदारांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष यासंबंधीचा निर्णय घेतली. मात्र ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळेची मर्यादा ठरलेली नाही. त्यामुळे ही सुनावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी विधीमंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोण आहेत अजय चौधरी?
अजय चौधरी हे दक्षिण मध्य मुंबईतील शिवडी मतदार संघातून विधानसभेवर निवडून आलेले आमदार आहेत. शिवसेनेतील वरिष्ठ आणि विश्वासू नेते मानले जातात. 2015 मध्ये शिवसेनेने त्यांच्याकडे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पद दिले होते. 2019 मध्ये त्यांना विधानसभेचं तिकिट देण्यात आलं होतं. त्यानंतर ते शिवडी मतदार संघातून निवडून आले. एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवण्यात आल्यानंतर शिवसेनेतील आमदारांची बैठक झाली आणि या बैठकीत अजय चौधरीच हे शिवसेनेचे गटनेते असतील यावर शिक्कामोर्तब झालं होतं. मात्र एकनाथ शिंदे गटानं यावर आक्षेप घेतला होता.